Header Ads Widget

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 15 पक्षांची आज बैठक

नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय योग दिवस पार पडल्यानंतर आता मंगळवारी राजधानी दिल्लीत राजकीय योगासने होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १५ पक्षांची बैठक बोलावण्यात आली अाहे. भाजपविरोधात मजबूत तिसरी आघाडी उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या पूर्वसंध्येला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दीड तास खलबते झाली. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप अशी तिसरी आघाडी उभारण्यासाठी ही राजकीय योगासने होणार आहेत. पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या