• Sun. May 28th, 2023

ही तर संत गाडगेबाबांनाच (शंकरबाबा पापळकर) डी.लिट.

मा. शंकरबाबा पापळकर यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केल्याची बातमी वाचली. तसे बघितले तर हा संत गाडगेबाबांचाच सन्मान. व्यतिमत्व विकासामध्ये शिक्षण हा मनुष्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण घटक आहे. सध्या आपल्याला माहित असलेले शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, महाविद्यालयात जाणे आणि डिग्री प्राप्त करून घेणे म्हणजे ‘ शिक्षण ‘. संत गाडगे बाबा कोणत्याही शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिकायला गेले नाही तरी पण ते शिक्षित होते. ते एक स्वतः चालते फिरते विद्यापीठ होते. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थाने ते शिक्षित होते. हा केवढा मोठा सन्मान झाला की, कुठल्याही शाळेत न जाता, महाविद्यालयात व विद्यापीठात न जाता त्या विद्यापीठाला नाव दिले जाणे. किती मोठी ही कामगिरी झाली.
बाप होणं हे काही सोपं नसतं. बाप होणं म्हणजे जबाबदारी घेणं, जबाबदारी निभावणं व कर्तव्य पार पडणं हे असत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही तर १२३ मुलांचं पालकत्व स्वीकारणं म्हणजे सोपं नाही. आणि ते ही अनाथ मुलांचं. खरोखर जेवढं कौतुक मा. शंकरबाबा पापळकर यांचं केलं तेवढं कमीच आहे. केवढं मोठं समाजकार्य, किती मोठी ही मानवता. ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना मदतीचा हात देणे ही खूप मोठी बाब आहे. ज्यांना आपल्या जीवनाचं सुद्धा भान नाही. कसे जगायचे हे माहित नाही त्यांची काळजी घेणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नेमके हेच शंकरबाबा पापालकरांनी ओळखले. त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितले व त्यांना जीवन जगण्याची दिशा दिली, अधिकार दिला. मा. शंकरबाबा पापालकरांनी खऱ्या अर्थाने संत गाडगे बाबांचा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वसा चालविला आहे. आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा गाडगे बाबांचे माणुसकीचे विचार कसे खरे ठरतात हे आपल्या समाजकार्यातून सिद्ध करून दाखविले. आज ह्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा गाडगेबाबांचे विचार ही काळाची गरज आहे हे सुद्धा आपल्या कृतीतून दाखवून दिले. असे म्हणतात की, त्याकाळी गाडगे बाबा म्हणायचे की, ” बाप हो तुमचा खरा नेता, उद्धारकर्ता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.” त्यांच्या बहुमूल्य मार्गावर चला. त्याकाळी ह्या महामानवाने दुसऱ्या महामानवाला ओळखले होते. त्याकाळी काही टी.व्ही. नव्हता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून सांगत. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याकाळचा टी.व्ही. हा संत गाडगेबाबा होते. आणि आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगातला गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरा जिता जागता टी.व्ही. हा म्हणजे मा. शंकरबाबा पापळकर आहेत. ते त्यांच्या कृतीतून गाडगे बाबांचं खरं कार्य रेखाटचत नाही तर त्यांच्या कार्याचा ” आखो देखा हाल ” समाजापुढे ठेवत असतात.
शेवटी जगण्यासाठी काय पाहिजे ? पैसा, प्रसिद्धी, पदवी की माणुसकी ? मला वाटंत शेवटी मानवता ही खरी ठरते. आपण कितीही पदव्या घेतल्या आणि मानवतेची जर झालर त्या पदवीला नसेल तर ती पदवी काळाच्या कसोटी वर खरी ठरत नाही. संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठाचे खऱ्या अर्थाने कौतुक व त्यांचे अभिनंदन की त्यानीं मा. शंकरबाबा पापळकर याना डी.लिट. पदवी प्रदान केली. मा. शंकरबाबा पापळकर यांचे खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..!

-अरविंद सं. मोरे,
नवीन पनवेल पूर्व
मो.९४२३१२५२५१,
ई-मेल : arvind.more@hotmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *