स्वबळाच्या नार्‍यावरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. त्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यावर काहीही भूमिका घेतली गेली नव्हती. मात्र, शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनाचेनिमित्त साधून उद्धव ठाकरेंनी त्यावर सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. जे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचे की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतेच नसते. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार? असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवंय. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चे बळ आणि आत्मविश्‍वास असायला हवा. जर आत्मविश्‍वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाही आणि आत्मविश्‍वास असेल तर जगाच्या पाठीवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेने दिले. सेनेची स्थापना झाली, तेव्हा मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. मराठी माणसाला अपमानित बनून जगावे लागत होते. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आज महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी अवहेलना झाली असती ती विचारता सोय नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकले तर आनंद आहे. पण हारल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते, असेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!