संभाजीराजेंच्या मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली असून कोल्हापुरात बुधवारपासून मूक आंदोलनास सुरुवात होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी होत असलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करताना अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही समावेश होता. संभाजीराजेंनी २९ मे रोजी पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असे यावेळी त्यांनी म्हटले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!