• Sat. Jun 3rd, 2023

शोषितांच्या वेदनेचा हुंकार म्हणजे “एका आंबेडकरवाद्याच्या कविता

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने झपाटलेला साहित्यिक म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेले कवी प्रा. इब्राहिम खान (मु.पो. ता.तिवसा जिल्हा अमरावती) यांचा “एका आंबेडकरवाद्याच्या कविता” हा काव्यसंग्रह म्हणजे आंबेडकरी चळवळीला ऊर्जावर्धक दिशा देणारा आणि शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजातील दुर्बल घटकाच्या व्यथा वेदनांना वाट मोकळी करून देणारा हा काव्यसंग्रह आहे. आपल्या प्रगल्भ लेखणीने साहित्य क्षेत्रात विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कवी इब्राहिम खानचे तत्पूर्वी अस्तित्वरेषा, युद्धखोरी,प्रस्फोट,

बहिणीच्या कविता हे काव्यसंग्रह तर गावाकडच्या कथा (कथासंग्रह) अक्षराच्या क्षितिजाआड (मुलाखत संग्रह) मुस्लिम महार (आत्मकथन) क्रांतीयोद्धा,यादवराव अण्णा देशमुख (व्यक्तिचित्र), उलंगवाडी सूर्यगंगेचे पाणी, वर्धेचे पाणी, बेंबळेचे पाणी, विदर्भेचे पाणी, वंशजाचे वादळ,विस्तव (कादंबरी) प्रकाशित झाले आहेत.समाजाशी नाड जुळून असलेले, ग्रामीण क्षेत्रात साहित्य संमेलने आयोजनाच्या माध्यमातून कवींनी जे अनुभवले, भोगले, सोसले अन दृष्टीत पडले तेच त्यांनी अगदी बिनधास्त आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने साहित्य स्वरूपात व्यक्त झाले.
 समाजजीवनाचं सर्वव्यापक वास्तवचित्र दृष्टिपटलावर आणणाऱ्या “एका आंबेडकरवाद्याच्या कविता” या काव्यसंग्रहात एकूण १२५ काव्यरचना आहेत.अंकुर प्रकाशन गौलखेडा जिल्हा अकोला द्वारा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. नसानसात आंबेडकरवाद भिनलेला चालता-बोलता काव्य रचनारा हा कवी विशिष्ट चौकटीत न रमता अनुभूती, वस्तुस्थिती यातून समाजमनाच्या भाव-भावना काव्यस्वरूपात व्यक्त करतात. शिक्षकी व्यवसायातील इब्राहीम खानानी रचलेल्या कविता ह्या सर्वांना समजेल उमजेल अशा साध्या सोप्या भाषेत आणि तितक्याच प्रभावी आणि जनमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.
बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित समाज रचनेला प्रेरक ठरतील तसेच सामाजिक राजकीय सोबतच धर्मांधता, धर्मनिरपेक्षता,राष्ट्रवाद आंबेडकरी चळवळ, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली इत्यादीचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यसंग्रहात उमटलेले आहे. मुस्लीम आणि महार अशा दोन्ही समाजाचे जिने जगलेल्या कवींनी मुस्लिम आणि बौद्धाच्या मनातील वेदनांचाही आढावा काव्यसंग्रहात घेतला आहे.
कवीचा डॉ. आंबेडकराच्या प्रगल्भ विचारावर प्रचंड असा विश्वास आहे. डॉ. आंबेडकराचे सर्वव्यापक/विश्वव्यापी विचारातच विषमतावादी समाजरचनेला योग्य अशी दिशा देण्याची ताकद आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. पण इथले तथाकथित आजही त्यांचे विचार मानायला तयार नाहीत. आंबेडकरांच्या विचारांना बगल देत त्यांच्या विचाराला दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांच्या कडून वेळोवेळी होत आहे. खानाच्या कविता ह्या असे प्रयत्न हाणून पाडनाऱ्या आहेत. प्रस्तापिताच्या प्रयत्नाना शह देणाऱ्या आहेत. त्याच अनुषंगाने कवी “नुस्ते” या कवितेत व्यक्त होतात की,
नुस्ते ग्रंथ जाळून
बाबा तुमचे तत्वज्ञान
दडपले जाणार नाही
तुमचे तत्त्वज्ञान
वैश्विक तत्वज्ञानाचा भाग
नुस्ते ग्रंथ जाळून—–“
 वर्णव्यवस्थेच्या चौकटीतील शोषित,पीडित, वंचित, दुर्बल घटकाच्या उत्थानासाठी डॉ. आंबेडकर आयुष्यभर झटलेत/लढलेत. त्यांच्या संघर्षातूनच भारतात नवी समाज रचना आकारास आली. न भूतो न भविष्यती असे समग्र परिवर्तन घडून आलेत. गावकुसाबाहेरील समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांनाही इतराप्रमाणे सन्मानाने मानवी जीवन जगण्याचे अधिकार मिळवून दिलेत.एकंदरीत पशूप्रमाणे जिने जगणाऱ्या अस्पृश्य समाजाला मानवी हक्क मिळवून दिलेत. म्हणून आंबेडकरांच्या कष्टातून/विचारातून/प्रेरणेतून त्यांच्या विचारांवर प्रचंड विश्वास असणारा आंबेडकरी समाज अस्तित्वात आला. मात्र डॉ. आंबेडकरांनी ज्या ऊंचीवर हा लढा आणून ठेवला होता तो लढा त्यांच्या अनुयायांना हा लढा पुढे रेटता आला नाही. अर्थातच वर्तमानात चळवळीसाठी निस्वार्थी धुरंदर असा नेताच दुर्मिळ झाला आहे. म्हणून सर्व सामान्य आंबेडकरी समूहाला डॉ. आंबेडकरांच्या प्रगल्भ नेतृत्वाची क्षणोक्षणी अन पावलोपावली आठवण होते हाच भाव (वेदना) कवींनी “महामानव” या कवितेत व्यक्त केला.
हे महामानवा
आजही आम्ही चाचपडत आहोत
गर्भ काळोखात
तेव्हा तू आठवतोस”
कवि इब्राहीम खान यांचे एक पाऊलही डॉ. आंबेडकराच्या विचाराशिवाय पुढे सरकत नाही. आंबेडकरी विचार त्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्य लेखनात प्रकर्षाने दिसून येते. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी विचारांची खोलवर पेरणी करून काव्य संग्रहाचे शीर्षक समर्पक ठरविण्यास यश मिळविले. दीक्षा, जाणीव, प्रचंड, आता कुणी वाली नाही, माझ्या पहिल्या मोर्चात बाबासाहेब आंबेडकर मला असे भेटले, युगप्रवर्तका, आंबेडकर गॉड, भूलवण, बाबासाहेब, सभा, विरोधक यांची कविता, बाबासाहेब आणि आशिया खंड, पोरखेळ नामांतराचा अशा अनेक काव्य रचनेतून जगाला डॉ. आंबेडकरांच्या विचाराची महती आणि आवश्यकता पटवून दिली.
भगवान गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि संत कबीर यांना डॉ. आंबेडकरानी गुरुस्थानी मानलेत. पिढ्यानपिढ्या निपचित पडलेल्या तत्कालीन महार आणि शोषितांना डॉ. आंबेडकरानीच समतेवर आधारित असा जनकल्याणकारी बुद्ध धम्माचा मार्ग दाखविला. धर्मांतरित बौद्धांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांचे कल्याण व्हावे अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पश्चात तथाकथित अनुयायांनी/धम्म प्रसारकांनी सोयीनुसार धम्माचा वापर करून धम्माच्या मूळ गाभ्यालाच धक्का दिला आणि देत आहेत.धम्माची विदारक स्थिती कवींच्या नजरेतून सुटली नाही. म्हणून “झेप”या कवितेत कवी म्हणतात की,
ह्या महाकाय धम्माची स्थिती आताशा भरकटुन गेली आहे
चिवर तर आता ते कुणासही देऊ शकतात”
 कवीने बुद्ध विचाराचा,झेप, बुद्धमय, अत्त दीप भव, बुद्ध आणि युद्ध, दीक्षा, निर्वाण अशा काव्यरचनेतून बुद्धाचे तत्वज्ञान मांडले आहेत. जगाला युद्ध नको बुद्ध हवा याची जाणीव करून दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांनी समग्र परिवर्तनासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. प्रस्थापिताच्या विरोधाला न जुमानता परिवर्तनाची कायम कास धरली.सामाजिक क्रांती घडवून आणली. स्त्रियांचा उद्धार अन प्रगतीसाठी वाट मोकळी केली. अनिष्ट प्रथांना तिलांजली दिली.फुले दाम्पत्याचा सुधारणेचा हा लढा त्यावेळी आणि आज सुद्धा विरोधकांच्या कधीच पचनी पडला नाही.कवींनी प्रस्थापितांच्या विरोधातच काव्याच्या माध्यमातून एल्गार पुकारला.”क्रांतीबा” या कवितेत कवी इब्राहीम खान म्हणतात की,
रचना डावाची
हाणून पाडण्या
आम्ही आहोत सज्ज
फिरवू आसूड तुमचा
क्रांतिबा !!”
 कवीनी याच काव्यसंग्रहात रेखाटलेले भगवान गौतम बुद्ध, महंमद पैगंबर, गुरुगोविंद सिंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, नेल्सन मंडेला सारख्या महापुरुषाची विविध रूपे वाचावयास मिळते.
कवीच्या काव्यात कल्पनाविलासास अजिबात स्थान नाही. जे अनुभवले, सोसले, तेच मांडलेत. त्यातूनच कवींनी बेरोजगारी अन विनाअनुदानित कर्मचाऱ्यांच्या वेदनेच्या कविताही काव्यात गुंफल्या आहेत. वाढत्या बेरोजगारीचे चटके कसे सोसावे लागते आणि वैफल्यग्रस्त बेरोजगार नाईलाजाने कसा आत्महत्येस प्रवृत्त होतो हे चित्र उभे केले आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या स्वरूपाने आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आता पदवी ऐवजी बेरोजगारीचे प्रमाणपत्र मिळू लागलेत आणि हेच प्रमाणपत्र त्यांना बेरोजगारीच्या खाईत लोटते अन वैफल्यग्रस्त करते.अनेकजण नाईलाजाने आत्महत्येसारखा मार्ग पत्करतो. उच्च शिक्षित अन बेरोजगारीचे वर्णन कवींनी आत्मनिवेदन, बोर्ड, बहर, हा देश की जेल, दीक्षा या काव्यरचनेत समर्पकपणे रेखाटले आहे. “दीक्षा” या कवितेत कवी म्हणतात की,
माझे कैक बेकार फिरणारे मित्र
कॉलेज शिकलेत
आणि नोकरी न मिळाल्याने पागल झालेत”
विनाअनुदानित शाळा/महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्यथाही बेरोजगारापेक्षा भिन्न नाहीत. भावी पिढी घडविणारे हे शिक्षक/कर्मचारी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वेठबिगारीचे जिने जगतात. पुरेशा वेतनाअभावी हे कर्मचारी परिस्थिती पुढे कसे हतबल होतात याची वास्तव मांडणी त्यांनी केली आहे. नष्टचर्य, नोंनग्रँट, विद्यापीठ कि विद्या आटा, त्याचेच द्योतक आहे. संधीसाधू नेते अन संस्थानिकांचाही त्यांनी खरपूस समाचार घेत कर्मचाऱ्यांना अत्त दीप भव चा संदेश देतात. “नष्टचर्य” या कवितेत कवी म्हणतात की,
कसे तरी जगत आहोत
आपण किड्यासारखे
मारत आहोत मुतात माशा
नॉनग्रॅंटच्या,
आपणास प्रकाशनारा
कुणी दर्डा नाही,
चला आपण हा अंधार संपवूया
नष्टचर्य घालवू या”
राजकारन्याच्या भ्रष्टाचारी,संधीसाधू आणि स्वार्थी वृत्तीमुळे भारतीय राजकारण पुर्णतः नासले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सत्तेसाठी, पैश्यासाठी, स्वार्थासाठी हे राजकारणी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी दर्शवितात. इतकेच नव्हेतर राजकीय स्वार्थासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासही मागेपुढे पाहत नाही. जनहित तर मते मागण्यापुरतेच मर्यादित राहिलेत. सत्तेची मस्ती चढलेल्याच्या विरोधात कवी आपली लेखणी झिजवतात. हिस्सा, सरकारी उत्तर, रचना, माझ्याशिवाय, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालममंत्री कसे हे राज्यकर्ते,राजभ्रष्टची कविता, वाटचाल, दिवसा ह्या देशातले, ३ मार्च १९८७, त्यांचे पुढे झाले, आवाहन, सत्तेकडे, जलाओ, लोकशाहीच्या नावाखाली, सत्तेकडे जात आहे, मंडल आयोग आणि आखाती युद्ध, पाठिंबा इत्यादी काव्यातुन राज्यकर्ते/राजकारणी आणि विद्यमा राजकीय स्थितीवर भाष्य करतात. राजकारणी मंडळी जनहिताला कसे सुरूंग लावतात हे “निश्चित” या कवितेत व्यक्त करतात की,
गावे पेटविण्याची
भाषा बोलणारे
हरामजादे पुढारी,
जनतेच्या अस्तित्वाला
सुरुंग लावताहेत”
 राज्यकर्त्यांकडून जनतेची होणारी अवहेलना बघून कवी म्हणतात की,
मंत्रालयात जावून
गोळीबार करावासा वाटतो ?
तर असे हे मार्ग
सत्तेकडे जाण्याचे
जनतेला लुटण्याचे”
शांतीदुताच्या भूमीला आज अराजकता, अशांतता, आतंकवाद, प्रांतवाद अशा प्रश्नांनी घेरले आहेत.जातीय दंगली, बलात्कार बाँबस्फोटच्या मालिका ह्या नित्याच्या झाल्या आहेत. महिला तसेच अल्पसंख्याक, मागासवर्गीयांना सुरक्षितता वाटत नाही. जातीयवाद थांबता थांबेना. कायदा व सुव्यवस्था बिघडली. न्यायदेवतेवर सर्वसामान्यांचा विश्वास राहिला नाही. बंधुभावाची कल्पना न केलेली बरी.नानाविध प्रश्नांनी घेरलेल्या देशातील स्थितीचे लंबोणी हत्याकांड, विसर, उभारनी, विसर, सावट, पुनर्निर्माण, नग्न भारतमाता या कवितेतून कुठे नेऊन ठेवला शांतीदूताचा भारत असा प्रश्न करतात.देशाचे विदारक चित्र बदलविण्यासाठी कविला बाबासाहेबाची आवर्जून आठवण होते.”लेखनासोबत बंदुका घ्या” या कवितेत कवी म्हणतो की,
बाबासाहेब म्हणत होते
घटना जाळण्याची मला संधी लाभावी
राज्यकर्ते होताहेत नादान
पाठीराखे झाले जातीयवादाचे गिधाडाचे
तेव्हा
लेखण्या सोबतच
बंदुका घ्या”
 डॉ.आंबेडकरांचे कर्तृत्व आणि संघर्षातून आंबेडकरी चळवळ उदयास आली.प्रारंभीच्या काळात भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरेल अशी कामगिरी चळवळीने केली. प्रस्थापितासमोर एक प्रकारचा वचक निर्माण केला होता. मात्र कालांतराने व्यक्तिगत स्वार्थ आणि सत्तेसाठी हपापलेल्या सत्तापिपासू नेतृत्वामुळे चळवळ विस्कटली. जातीयवाद्याच्या विरोधात लढणारे नेते कायम आंबेडकरी चळवळीचा द्वेष करणाऱ्याच्या तंबूत जाऊन बसलेत. नेतृत्वाअभावी आंबेडकरी जनताही सैरावैरा झाली. अन्याय्य वाढलेत.आंदोलने थांबलीत. चळवळीची ही स्थिरावस्था बघून आंबेडकरी धुरंदर नेत्यांना/कार्यकर्त्यांना आज खऱ्या अर्थाने चिंतनाची गरज आहे असे कवीला मनोमन वाटते.त्यांची ही तळमळ काव्यसंग्रहातील कलाटणी, लाथ, संपन्नता, चार शब्द, हे जगणे, अभिच्छा, निवेदन, सोफास्तिकेटेड, वाट, मुकाबला, पिशाच्च, विपन्नावस्था, संधी, सलग्न, चक्की आणि चूल, प्लास्टिक मुखवटे, गढी,भाकरीची नदी या काव्यातुन व्यक्त होते.
 एकंदरीत प्रा इब्राहिम खानच्या कविता ह्या बाबासाहेबांच्या विचारांना स्पर्श करणाऱ्या तर आहेतच शिवाय सामाजिक प्रश्नही हाताळणाऱ्या आहेत.वर्णव्यवस्थेच्या वर्चस्वाचे विध्वंस करणाऱ्या आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या आहेत.सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणाऱ्या बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे समर्थन करणाऱ्या आहेत. शोषितांच्या वेदनेचा हुंकार व्यक्त करणाऱ्या आहेत.त्यामुळे हा काव्यसंग्रह पुरोगामी विचारसरणीचे वाचक निश्चितच भरभरून स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो आणि कविला पुढिल सकस साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो.
——————————————
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
जिल्हा अमरावती
मोबाईल- ९९७०९९१४६४
ईमेल
nareshingale83@gmail.com
—————————————-
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
मोबाईल- ९९७०९९१४६४
———————————————-

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *