• Mon. Sep 18th, 2023

वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहु महाराज

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
 आज कित्येक गरजू आणि हुशार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेतांना आपण बघत असतो. मी सुद्धा पाच वर्षे समाजकल्याण वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात नंबर न लागल्यामुळे काय त्रास सहन करावा लागतो याची जाणीव झाली आहे. कारण मनात शिक्षण घेण्याची तर तीव्र इच्छा असते पण कुठंतरी परिस्थिती आडवी येते. जे विद्यार्थी वसतीगृहात नंबर लागल्यावर आपले शिक्षण होईल या आशेवर शहरात येतात पण त्यांचा नंबर वसतिगृहात लागला नसेल आणि शिक्षण घेण्याची खुप आवड आहे अश्या विद्यार्थ्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशीच काही परिस्थिती शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आली होती.
कॉलेज, शाळा काढल्या पण काही विद्यार्थ्यांना राहायची सोय नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून १८९६ मध्ये सर्व जातीजमातीसाठी एक वसतिगृह स्थापन केले. पण तीन-चार वर्षात वसतीगृहावर नेमल्याने अधिकाऱ्यांनी ब्राम्हण विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बाकी विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाच नाही. ज्या वेळी हि बाब शाहू महाराज यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्याचा विचार केला. त्याला अनुसरून त्यांनी रितसर १९०१ पासून जाती-जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करायला सुरुवात केली. १८ एप्रिल १९०१ साली त्यांनी सर्वप्रथम “व्हीक्टोरिया मराठा बोर्डिंग” स्कुल ची स्थापना केली. त्या इमारतीच्या बांधकामासाठी २५०००/- रुपये देऊन प्रोत्साहन दिले. तसेच दरवर्षी ५५०/- रुपयांची ग्रँट सुरु केली. ह्यामध्ये मुसलमान,अस्पृश्य आणि सर्व समाजातील विद्यार्थी राहायचे. १९०१ मध्ये दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना करण्यात आली. त्यावेळी माणिकचंद हिराचंद यांनी २४ रूमची इमारत स्वतःच्या पैश्यातून बांधून दिली. या बोर्डिंग ला महाराजांनी ३५०/- रुपये ग्रँट दिली होती. या वसतिगृहात विद्यार्थी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिकले होते.
मुस्लिम बोर्डिंग तयार करण्याचा विचार महाराजांना १९०२ मध्ये आला होता पण मुस्लिम पुढारी जबाबदारी घेण्यासाठी समोर न आल्यामुळे मुस्लिम विद्यार्थी पहिले व्हीक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये राहायचे. शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९०६ मध्ये “दि मोहोमेडन सोसायटी” ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून मुस्लिम बोर्डिंग ची स्थापना करण्यात आली. त्यासाठी शाहू महाराजांनी २५० रुपयांची ग्रँट देऊन बांधकामासाठी २५००० चौ. फूट जमीन दिली. १९०६ वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले. लिंगायत समाजातील पुढाऱ्यानी घोलकर बंगला खरेदी करून वसतिगृह सुरु केले. त्या वसतिगृहात महाराजांनी २५०/- रुपयांची ग्रँट सुरु केली. मुंबई गव्हर्नर जार्ज क्लार्क यांच्या मुलीमध्ये असलेली सामाजिक बांधिलकी बघून “मिस क्लार्क” यांच्या नावाने वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहाच्या संस्थेचा “अस्पृश्य समाजासाठी अस्पृश्यातूनच सुशिक्षित आणि सुधारणावादी पुढारी निर्माण व्हावे” असा एक उद्देश होता.
 सोनार समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे ह्या हेतूने “दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग” ची स्थापना केली. त्या वसतिगृहासाठी त्यांनी दरवर्षी १८०/- रुपयांची ग्रँट सुरु केली. तसेच शुक्रवार पेठेतील एक मोठा वाडा २०००/- रुपयाला खरेदी करून श्रीनामदेव बोर्डिंगची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी ५०/- रुपयांची ग्रँट सुरु केली. तसेच पांचाळ ब्राम्हण वसतिगृह सुरु करुन नंतर पाच हजार रुपये सरकारच्या तिजोरीत ठेऊन ८% व्याज ठेवींवर देण्याची व्यवस्था महाराजांनी करून दिली. श्रीमती सरस्वतीबाई गौड सरस्वत ब्राम्हण विद्यार्थी वसतिगृह आणि इंडियन ख्रिश्चन होस्टेल १९१५ मध्ये स्थापन केले. तसेच इमारतीच्या जागेसह ६०००/- रुपयांची मदत करून आपल्या एकनिष्ठ दिवाण रावबहादूर सबनीस प्रभू यांच्या नावाने बोर्डिंग सुरु करून ५०/- रुपयांची दरवर्षी प्रमाणे ग्रँट सुद्धा सुरु केली. शाहू महाराजांच्या प्रेरणेने आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. मोफत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी महाराजांनी १५० एकर जमीन आणि ६०,०००/- रुपये दिले होते. तसेच वैश्य बोर्डिंगची सुद्धा स्थापना केली.
सर्व अस्पृश्य जातीसाठी एक वसतिगृह असावे अशी महाराजांची इच्छा होती म्हणून त्यांनी ढोर-चांभार बोर्डिंग ला १००० रुपये देऊन १९१९ मध्ये बोर्डिंग सुरु केली. बोर्डिंगला दरवर्षी २२५/- रुपयांची ग्रँट सुरु झाली. वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी वैदिक विद्यालय तसेच वसतिगृहाची निर्मिती केली. तसेच सुतार बोर्डिंग ची स्थापना करण्यात आली. या बोर्डिंगमध्ये गुजरात-कर्नाटक मधून विद्यार्थी शिकायला येत होती. नाभिक विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना करून यासाठी वार्षिक १५०/- रुपये ग्रँट सुरू केली. बोर्डिंग ला २००/- रुपयांची भांडी खरेदी करून दिली. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंगसाठी जागा देऊन तसेच श्रीदेवांग बोर्डिंगसाठी जागा गंगावेशीत दिली. वरील सर्व वसतिगृह कोल्हापूर संस्थानातील होती..
 शाहू महाराज फक्त आपल्या संस्थानातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून दिले नाही तर नागपूर मध्ये अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी चोखामेळा बोर्डिंग साठी त्यांनी ५०००/- ची देणगी दिली. पुण्याच्या एका वसतिगृहासाठी सुरुवातीला ३००/- रुपयांची भांडे घेऊन दिली. तसेच नाशिकच्या वसतिगृहासाठी १५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वसतिगृहात गरिबांतील गरिबाला शिक्षण दिले. त्याला शिष्यवृत्त्या सुद्धा दिल्या. नुसते वसतिगृह शाळा काढली नाही तर त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा, खाण्याचा, राहण्याचा खर्च सुद्धा उचलला. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची आवड निर्माण व्हावी ह्या हेतूने चांगल्या प्रतीचे जेवण मिळावे म्हणून मुलांसाठी तूप, मटण, जिरणे भात देत होते. तसेच नाटकाचे प्रयोग आणि कुस्त्या असल्यावर विद्यार्थ्यांना फ्री मध्ये प्रवेश दिला जायचा. समाजातील तळागळातील लोक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि समाजाची प्रगती करावी ह्या हेतूने प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून शिक्षणाची दारे उघडी करून दिली अश्या शाहू महाराजांच्या दिव्य दृष्टीला मानाचा सलाम…!
#लोकराजाशाहू
#सामाजिकन्यायदिन
#LokRajaShahu
(संदर्भ:-राजश्री शाहू गौरव ग्रंथ)

– सुरज पी. दहागावकर.

चंद्रपूर.
मो.न.8698615848

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,