नागपूर : रस्ता सुरक्षा अभियान हे अत्यंत महत्त्वाचे असून दरवर्षी रस्त्यांवर ५ लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मृत्यू हे अत्यंत दुर्दैवी असून लोकांच्या सहकार्यातून अपघातातील हजारो लोकांचे प्राण वाचवणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘फिकी’च्या पदाधिकार्यांशी ‘रस्ते अपघातात होणारे मृत्यू’ या विषयावर ते संवाद साधत होते. या आभासी कार्यक्रमाला फिकीचे अध्यक्ष रमाशंकर पांडे, महासचिव दिलीप चिनॉय, नवृत्ती राय, भार्गव दासगुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना गडकरी म्हणाले, महामार्गावरील, राज्यातील आणि जिल्ह्यातील अपघात स्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्पोरेट संस्थेने अपघातांच्या कारणांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आपल्याला द्यावा. यामुळे रस्ता सुरक्षेत अधिक सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होईल. अपघातांची कारणे, जबाबदार कोण आणि समस्या शोधणे आवश्यक आहे. अपघात स्थळे शोधण्यासाठी महामार्ग मंत्रालय अधिक प्रयत्नशील आणि गंभीरही आहे. १५ ते २0 टक्के अपघातांसाठी वाहनांचे चालक जबाबदार असतात, तर १0 ते १५ टक्के अपघात ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमुळे होतात. यावरही अभ्यास व संशोधन करण्यात येऊन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. अपघातांवर नियंत्रण आणणे आणि रस्त्यावरील अपघातात होणारा मृत्यूदर घटविणे यासाठी रस्ता सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, ही एक स्वतंत्र संस्था असून अंतर्गत वाहतूक आणि रस्ता सुरक्षेबाबत ही संस्था काम करणार आहे. नवृत्त आयएएस अधिकारी व अन्य अधिकार्यांची या संस्थेवर नियुक्ती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
लोक सहकार्यातून अपघाती मृत्यू कमी करणे शक्य
Contents hide