यवतमाळ : तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तसेच कोरोना व इतर आजारापासून बचावासाठी सर्वांनी योगाभ्यासाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. केवळ योग दिन साजरा करण्यासाठीच नव्हे तर रोज किमान एक तास तरी नियमित योगा करून आपले आरोग्य कायम सुदृढ व निरोगी ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी योगदिनानिमित्त नागरिकांना केले.
आज सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नेहरू युवा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी उमेश बडवे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की शासकीय कामकाज करताना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनेकदा कामाचा ताण येतो, या ताण तणावातून मुक्त होण्याकरिता नेहमी योग व प्राणायाम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थितांकडून नियमित योग करण्याचा व निरोगी राहण्याचा संकल्प करवून घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा योग संयोजक राजु पडगीलवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांनी व्यक्त केले. याप्रंसगी भारत स्वाभिमान ट्रस्टचे दिनेश राठोड, आर्ट ऑफ लिव्हींगचे शंतनु शेटे व सुहास पुरी, पातंजली योग समितीचे संजय चाफले, माया चव्हाण, कविता पवार, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे महेश जोशी, मनिष गुबे, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योग शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित योगा आवश्यक -जिल्हाधिकारी
Contents hide