राज्यात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : राज्यात पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने कोकण आणि महाराष्ट्र व्यापला असून पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मृग नक्षत्र लागताच पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे खरिपातील पेरणीला सुरुवात होणार आहे.
मुंबई व कोकण किनारपट्टीसह राज्यात अतवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच मुंबईत चार दिवस ऑरेंज अँलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाने मुंबईला सकाळपासून झोडपल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना अँलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अँलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असे हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितले. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अँलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहितीही शुभांगी भुते यांनी दिली.
मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. वरळी आणि प्रभादेवीतील रस्ते पाण्यात गेले आहेत. हिंदमाता येथे अडीच फूट पाणी साचले आहे. तसेच सायन आणि चुनाभट्टी येथे रेल्वेरुळावर पाणी भरल्याने लोकल ठप्प झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेने मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचं कंट्रोल आपत्ती निवारण कक्षात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कक्षात येऊन मुंबईतील विविध भागांची पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर टीटी किंवा हिंदमाता येथे पाहणी करण्यासाठी न येता ते थेट पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात आले. या कक्षातून त्यांनी अवघ्या पाचच मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला. मानखुर्दमधील नव्या उड्डाण पुलाखाली पाणी भरले होते. त्याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतची माहिती दिली.
यावेळी महानगरपालिकेच्या सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्‍विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर हे उपस्थित होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!