माय

चालवित होती संसार गाडा

ढोर मेहनत करून ।
चिल्यापिल्यांना भरवत होती
पोट आपलं जाळून ।।
दुसऱ्याचे कपडे उसवून
आमच्या मापाचे करायची ।
संकटाचं फाटलेलं आभाळ
मोठ्या यत्नानं जोडायची।।
माय येई झाड-लोटीहुन
पदरात शिळे-पाते घेऊन ।
अंधारलेली पोट रिकामी
वाटच पाही आतुर होऊन।।
दादातू शिक रे बाबा
सारखा-
तुला काम नाही होणार ।
भिक मागील पण शिकविणं
ठाम तिचा निर्धार ।।
माय पडली आजारी
तिनं मनी ठरवलं ।
अभ्यास बुडेल लेकराचा
मला नाही कळविलं ।।
मातीकाम करता करता
देहाची पूरती माती झाली ।
गती देण्या लेकरांना
स्वतःमात्र गतीहीन झाली।।
आमच्यासाठी माय तू
हाडाची काडे केली ।
ढोर मेहनत तुझी
सरतेशेवटी फळा आली।।
पण जेव्हा वेळ
तुझ्या सुखाची आली।
तेव्हा–
सोडून आम्हा वाऱ्यावर
माय’
काळाच्या उदरात गडप
झाली।।
प्रा.रमेश वरघट
करजगाव
ता.दारव्हा जी.यवतमाळ