आली मिरगाची छाया
ओळ मनाले लागली
कवा भिजवन काया
माया कास्तकार बापा
माया निरोप तू देजो
आता आसुसली काया
म्हना लवकर येजो
जीव जायत्या उनीची
सारी खबर सांगीन
माया आंगाले जायलं
त्याची परेड घेईन
चार मयने बाई मी
होती तापानं कन्हत
नाई आली दया मया
होता सोताच्या गुर्मीत
आता लागला मिरुग
फुटे उकया मनात
माया कुकवाचा धनी
आला वाजत गाजत
माया कास्तकार भाऊ
बीज घिऊन येईन
शालू हिरवा नेसून
नवी नवरी दिसीन
चाले शेतात पेरनं
बिया तासानं पळते
माती पोटुसीन राहे
माय सातवा करते
आता पान्यानं येतीन
मायेवाले चिलेपिले
माया आंगा खांद्यावर
खेयतीन वाले वाले
तूर पयाटी जेवारी
पोरी वयात येतीन
नाना रंगाच्या फुलाचा
गजरा केसाले लावन
पात्या फुलानं बोंडानं
लतपत दिसतीन
लेकी उजवाले येता
चिंता बापाले लागीन
बाप हरकून जाई
नाती नाताले पाऊन
उस्नं पासंनं आनून
त्याचं लगीन लावन
बाभूईच्या मांडवात
लोक जेवाले बसीन
बैल करीन ईश्राम
थके चालून चालून
माई गावच्या वाटीनं
मंग निंघन वरात
पाय नवतीचे पळन
सासरच्या आंगनात
राती सपन पळलं
बरी लागीन आराजी
घरी लक्षुमी येईन
नोका करजा कायजी
– अरुण विघ्ने