• Sun. Jun 11th, 2023

माझी आई मायेचा सागर..!

आई गेल्यानंतर

रडून मोकळे होता आले नाही…
वात्सल्याच्या पारंब्या
अपरंपार असतात…
अजूनही तिचा काळजीवाहू
वावर जाणवतो चराचरातून
एक मोठीच पडझड
एका अंधार संध्याकाळी
दिवे लावणीनंतर
आईने डोळे मिटले
आईच्या डोळ्यातला
उजेड विझला…
उभारी देणारा…
माझ्यासाठी मीच पोरका झालो
हे पोरकेपण कशानेच झाकत नाही
मृत्यू असा निःपात करतो
एकाएकी घडते नको ते
निसर्गाच्या करुणेचेही गूढ
उलगडत नाही !
अनेक ठेचा आघात अश्रू
काळजीने पोखरलेल्या रात्री
कष्टाने थकलेले दिवस
श्रांत संध्याकाळी
ती शोधत राही
दुःखाचा परिहार
शेत, नदी आणि निसर्ग
हाच तिचा भाव
तिच्या हातातला विळा
तणाने वेढलेल्या पिकास
धीर देई
गांजलेली भूई
लख्ख होई…
आठवांचे आभाळ भरुन येते
पुनःपुन्हा
गाव आणि वावर
तिचा सत्त्यावरचा निःसिम भक्तीभाव
जाताना कुणाही विषयी
कसलीही तक्रार नाही
मातीनेच शिकवला होता
तिला क्षमाभाव…
सुभाष गडलिंग
 वडीलांनी मारलं की, बचावासाठी आईच्या मागे लपून आश्रय घ्यायचो. वडील बोलले की, न जेवता खोटं खोटं झोपायचो. आई रात्री उठवायची, समजवायची आणि जेवू घालायची. पोटात जेवन गेलं की राग शांत व्हायचा, मग पश्चाताप वाटायचा, ही लोकं मरमर करून आपल्याला पोसतात, शिकवितात, सर्व इच्छा पूर्ण करतात आणि शिक्षणात दुर्लक्ष केले की, पार्श्वभागावर दे दनादन देतात. त्यावेळी हे सारं कठीण वाटायचं. नकोसं वाटायचं. पण बाप हा बाप असतो आणि आई ही आईच असते ती मग कुणाचीही असो. त्यांची मुलांच्या भविष्याविषयी असलेली दुरदृष्टी कालांतराने कळायची. तेव्हा आपले माय-बाप किती महान आहेत, याची प्रचिती नंतर यायची. त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीत काहीही झालं तरी, कुठेही पाठवून मुलांना शिकवायचंच असा चंगंच बांधला होता. संघर्षातून शिकलो, नोकरीस, व्यवसायास लागलो, सर्व ठीक झालं होतं. पण काही गोष्टी नियतीला मान्य नसाव्यात कदाचित, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणेच मृत्यू अटळ आहे.
माझी आई अनुसयाबाई श्रीरामजी धवणे हिला जाऊन आज दि.21/06/2021 ला वर्षामागे वर्ष जावून 18 वर्षाचा काळ लोटला. मात्र आमच्या मनातील खड्डा तसाच राहिला. शेवटपर्यंत माझ्या सुख-दुःखात आई सोबत होती. मला 2002 मध्ये नोकरी लागली. दिड पावनेदोन वर्ष नोकरी करून काही कारणास्तव माझी नोकरी काळाने हिरावून घेतली याचा आईच्या मनावर तिव्र आघात झाला व आईला हृदयविकाराचा झटका येवून ती कायमची शांत झाली. मृत्यू अटळ आहे, आईस एकनएक दिवस मृत्यू आलाच असता पण आईच्या मृत्यूस आपण, आपली नोकरी कारण ठरावे याची सल मनात अजूनही कायम घर करून आहे.
1984 पासून जवळपास आईला 100% अपंगत्व असूनही तिने मृत्यूला सहजासहजी त्याला जवळ येवू दिले नाही. वेदना असह्य होत असतानाही टनकपणे बोलायची. मला फार नवल वाटायचं तिच्या सहनशक्तीचं, पण तिची एक ईच्छा अधुरीच राहीली असावी. एक मुलगा म्हणून मला ती पूर्ण नाही करता आली. तेवढीच एक सल मनात रुतून बसली आहे कायमची. ती पूर्ण करण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करीत असेल कदाचित, हीच तुझ्या स्तृतीदिनी माझी ग्वाही असेल आई.
कोटी कोटी वंदन तुला !
“आई असते जन्माची शिदोरी जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही.”
बंडूकुमार धवणे
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *