अमरावती : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत *कविता महामानवाच्या* या सदराखाली आभासी पद्धतीने दिनांक २/६/२०२१ ला नुकताच कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Contents hide
या प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमती स्मिता मोरे समतादूत बार्टी यांनी केले होते.कविता महामानवाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले जेष्ठ आंबेडकरी कवी, साहित्यिक मा.शिवा प्रधान यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक मा.शिवा इंगोले मुबंई व बार्टी अमरावती चे प्रकल्प अधिकारी माननीय विजय वानखेडे हे होते. कार्यक्रमाच्या आयोजक समतादूत मा स्मिता मोरे यांनी कार्यक्रमाला निमंत्रित सर्व मान्यवर कवींचे आभासी पद्धतीने ,शब्दसुमनांनी स्वागत करून प्रमुख पाहुणे व निमंत्रित सर्व मान्यवर कवींचा संक्षिप्त परिचय करून दिला. महामानवाच्या कविता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले जेष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक मा. शिवा प्रधान सरांनी आपल्या प्रबोधनपर अध्यक्षीय भाषणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य घरोघरी पोहचविण्याचे सर्वोतोपरी कार्य बार्टी ही संस्था करत आहे असे प्रतिपादन केले. ज्यांनी संविधानरुपी राज्यघटना चौकटीत बसवून विविधतेतला भारत एकसंघ ठेवून खरी राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे. तेंव्हा त्या महामानवाचे विचार व त्यांच्या विचारावर साहित्य निर्मिती करणारे, विषमतेच्या झळा सोसून ज्यांनी स्वाभिमानी जगणे दिले त्या तमाम तत्वज्ञानाचा जागर करणे आवश्यक आहे.त्याकरिता आपल्यातील कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत ,नाटककार,भाष्यकार, संशोधक आदी सर्वानी त्यांच्या विचाराची कास धरून प्रबोधनाची सरिता प्रवाहित करण्याची गरज आहे. महामानवाचे विचार स्वतंत्र, समता ,बंधुता, न्याय ही विचारधारा( आंबेडकर थॉट्स ) हे तमाम लोकांपर्यंत, गावागावात, वस्तीवस्तीत ,घराघरात विवीध भाषेतून पोहचविण्यासाठी असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आयोजित करून ही समतेची विचारधारा प्रवाहित करावे असे महत्वपूर्ण प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून जेष्ठ आंबेडकरी कवी, साहित्यिक शिवा प्रधान यांनी केले.
प्रसंगी त्यांनी समतेची प्रभात या त्यांच्या काव्यसंग्रहातील महामानवाला समर्पित *क्रांतिस्तंभ* ही कविता सादर केली. क्रांतिस्तंभ ही कविता महामानवाच्या लढ्याची, शौर्याची, लेखणीची यशोगाथा चित्रित करणारी आहे. कविता खूप काही सांगून गेली. कवितेच्या विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ही कविता ठरली आहे.
कविता महामानवाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जेष्ठ आंबेडकरी कवी,साहित्यिक मा. शिवा इंगोले यांनी ‘आई ‘ नावाची कविता सादर करून आईच्या नात्याचे विविध पदर उलगडले. ही कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. मी माझ्या गावलाच देश संबोधतो, एकात्मता जोपासनारी अशी ही राष्ट्रसमर्पित आई संविधानाचा एकसंघपणा जोपासत आहे. शिवा इंगोले यांच्या विद्रोह या कवितेत ते म्हणतात चळवळीतील विद्रोहाची धार कशी बोथट होत गेली. विद्रोह कसा मवाळ होत गेला. विद्रोह कसा लाचार होत गेला. याचे समर्पक शब्दशैलीत चिंतनशील मनाची विद्रोहाची व्यथा व्यक्त केली. धीरगंभीर स्वरूपात सादर केलेली कविता रसिकांची मने अंतः मुख करत गेली.सदर कार्यक्रमात मा.प्रमोद वाळके(युगंधर) नागपूर यांची ‘रंग निळा’ ही गेय कविता रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.तर वणी यवतमाळ चे तरुण कवी मा. *सुरेश पेंढरवाड* यांच्या *बाबासाहेब एक महासंग्राम* या कवितेणे रसिकांची चांगलीच दाद मिळविली. तसेच गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश घेऊन येणारी कवी सुरेश पेंढरवाड यांची *परिवर्तन* ही कविता आजच्या सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून क्रांतीची मशाल पेटवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा परिवर्तन घडवून आणण्यासाठी परत येणाचे नम्र आवाहण करते.अमरावतीचे जेष्ठ गझलकार मा. विष्णू सोळंके यांची ‘संकेत’ ही गझल गेय स्वरूपात सादर केल्या मुळे वातावरण धीरगंभीर करत गेले. तिवसा अमरावती येथील जेष्ठ कवी मा.इब्राईम खान यांनी ‘रचना’ ही कविता सादर करून विद्रोहाची धग कवितेतून चित्रित केली.तसेच *सत्तेकडे* ही विचार प्रवण करायला लावणारी कविता सादर केली. वरूडच्या कवयित्री मा.संध्या सराटकर यांनी ‘बाबासाहेब ‘ही कविता सादर करून महामानावाची शांतता, धैर्य कवितेतून मांडले. अमरावती येथील कवयित्री मा.प्रतिभा प्रधान यांनी *भीमबाई माझा* हा अभिवादनाचा अभंग सादर केला.तर अमरावती येथील जेष्ठ कवी मा.दिगंबर झाडे यांनी ‘ बाबासाहेब’ ही कविता अतिशय तळमळीने सादर करून रसिकांना अंतः मुख केले. बडनेरा येथील कवयित्री मा.माया गेडाम यांनी ‘रमाई दिसत नाही दीक्षाभूमीवर’ ही मन हेलावून टाकणारी कविता सादर केली.नागपूर वरून डॉक्टर वीणा राऊत यांनी *अस्तित्व* नावाची महिलांना समर्पित कवितेतून समस्त बहुजन महिलांना जागृत केले.त्याचप्रमाणे बार्टी च्या समतादूत स्मिता मोरे यांनी सुद्धा कविता सादर केली.
महामानवाच्या कविता या कार्यक्रमाचे प्रभावी,कार्यक्रमाची शोभा वाढविणारे ,रंगतदार असे सूत्रसंचालन बार्टी च्या समतादूत स्मिता मोरे यांनी केले तर आभार बार्टी च्या समतादूत सोनाली रंगारी यांनी माणलेत. झूम मिट वर झालेल्या या आभासी कार्यक्रमाला महाराष्ट्रातील बहुसंख्य रसिक, कवी, व विचारवंत उपस्थित होते.