भारताची युवा तायक्वांदो खेळाडू अरुणा तन्वर चालली टोकियोला !

नवी दिल्ली : यंदाच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताकडून तायक्वांदो खेळाडू अरुणा तन्वर सहभागी होणार आहे. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून अरुणा या स्पर्धेत प्रवेश करणार आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय तायक्वांदो खेळाडू ठरली आहे. अरुणाला तिच्या उत्तम कामगिरीमुळे वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला, असे भारतीय ताइक्वांडोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.
पाचवेळा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या अरुणाने गेल्या चार वर्षात आशियाई पॅरा तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि जागतिक पॅरा तायक्वांदो स्पर्धेत पदके जिंकली आहेत. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा खेळली जाईल.
हरयाणाच्या भिवानी जिल्हय़ातील रहिवासी असलेल्या अरुणाचा जन्म झाला तेव्हा तिच्या कुटूंबाला समजले, की तिच्या हाताच्या हाताची बोटे खूपच लहान आहेत. पण अरुणाने कधीही स्वत: ला कमी समजले नाही. तिचे वडील खासगी बस चालक आहेत. आपल्या मुलीने देशाचे नाव उंचावले पाहिजे, असे अरुणाच्या वडिलांचे स्वप्न होते.
पॅरालिम्पिकमधील भारताचा प्रवास १९६८पासून सुरू झाला. १९७६ आणि १९८0 वगळता भारताने सर्व स्पर्धात भाग घेतला. २0१६च्या रिओ पॅरालिम्पिकस्पर्धेत भारताने चार पदके जिंकली होती. १९६0मध्ये पहिल्यांदा रोम येथे पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!