अमरावती : हसण्याखेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात एकाही लेकरावर मजुरीची वेळ येऊ नये. त्यामुळे बालमजुरीची कलंकित व अनिष्ट प्रथा नष्ट करून बालकामगार मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. बालमजुरी प्रथा समूळ नष्ट करण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याचे कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.शासनाच्या कामगार विभागामार्फत दि. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे औचित्य साधून बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त कामगार राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, गरीब कुटुंबातील मुलांना हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान वयातच मोलमजुरी करावी लागते. अतिशय कमी वयात त्यांना कामावर जावे लागते. अशी वेळ जेव्हा लहान मुलांवर येते ती अवस्था त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. अशावेळी प्रत्येकाने बालमजुरीला नकार दिला पाहिजे व गरजू मुलांना वेळीच मदत केली पाहिजे. कुणीही बालकाला मजुरीवर पाठवू नये व कुणी बालक कौटुंबिक गरजेपोटी कामावर आले तर त्याच्याकडून काम करून न घेता संवेदनशीलता बाळगून त्याला संपूर्ण मदत करावी, असे आवाहन कामगार राज्यमंत्री कडू यांनी केले.
बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करू – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू
Contents hide