यवतमाळ : मृगाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वत्र सलग ४ ते ५ दिवस चांगला पाऊस पडला. यामुळे बहुतांश भागातील शेतकर्यांनी अगोदर धूळ पेरणी व नंतर इतर पेरणी आटपवून घेतली. मात्र, पेरणीनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे व दिवसभर कडक उन तापत असल्याने बियाणे जमिनीत जळल्या गेली व ज्या भागात बियाणे उगवली होती. तेथे आता तीव्र उन्हाने मरून जात आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
ज्या शेतकर्यांच्या शेतात पुरेश्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनी कृत्रिमरित्या पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांना दुबार पेरणी शिवाय पर्याय उरला नाही. काही शेतकर्यांचे सुरुवातीच्या अतिपावसाने पेरलेले बियाणे दडपल्या गेल्याची उदाहरणे सुध्दा आहे. आता गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाच्यावतीने समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, दरवर्षीचा अनुभव असलेल्या शेतकर्याने कृषी विभागाच्या या आवाहनाने दुर्लक्ष केले.
याशिवाय सुरुवातीच्या काळात हवामान खात्याने मुबलक पाऊस पडेल असे भाकित केले होते. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाने पाऊस येणारच या विश्वासाने पेरण्या उरकून घेतल्या. मात्र आता अत्यावश्यक असतांना पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून हुलकावणी दिली आहे.
यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त होता. तरीही शेतकर्यांनी जादा भाव देऊन चांगल्यात चांगले बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय खताचेही भाव वाढल्याने शेतकर्यांना यावर्षी पेरणीचा किमान दिडपट तरी खर्च आला आहे. सुरुवातीला मोठी लागत लागल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे अश्या परिस्थितीत जर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पावसाअभावी शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट !
Contents hide