• Sat. Jun 3rd, 2023

पावनखिंडचा थरार चित्रपटगृहातच !

मुंबई : मागील वर्षभरापासून कोरोनानं जगभर कहर माजवला आहे. या वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवरील निबर्ंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असे असले तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा पावनखिंड महत्त्वाकांक्षी चित्रपट १0 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं पावनखिंड नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चित्रपट सर्वार्थाने तयार आहे, पण कोरोनाचे सावट अद्याप गडद असल्यानं रसिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. सिनेमागृहांचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच पावनखिंडच्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार आहे. या चित्रपटातील वैशिष्ट्य टप्प्याटप्प्याने रसिकांसमोर येणार आहेत. ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या पावनखिंड या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निमार्ते अजय-अनिरूद्ध आरेकर यांनी केली आहे.
पावनखिंड हा चित्रपट दिग्पालनं संकल्प केलेल्या शिवराज अष्टकातील तिसरं पुष्प आहे. या पुष्पमालेतील फर्जंद आणि फत्तेशिकस्त हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लवकरच पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम सिनेरसिकांना चित्रपटगृहांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *