नाशिक : डाळिंब बागांसाठी देशभरात नावाजलेल्या बागलाण तालुक्यातील शेतकर्याने काश्मीरच्या सफरचंदाची फळबाग लावून ती यशस्वीरित्या फुलवून दाखवली आहे. हा प्रयोग मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाल्यास बागलाणच्या मातीतील काश्मिरी सफरचंदाचा गोडवा चाखायला मिळणार आहे.
बागलाण तालुक्यातील आखातवाडे येथील युवा शेतकरी चंद्रकांतने हा अफलातून प्रयोग करून दाखवला आहे. काश्मीर व्यतिरिक्त सफरचंद पिकतच नाही, अशी दृढ भावना अनेक शेतकर्यांमध्ये आहे. मात्र, चंद्रकांतने त्या भावनेला तढा दिला आहे. त्याने यासाठी गुगलच्या माध्यमातून काश्मीरच्या सफरचंद बागेची माहिती घेतली. त्यानुसार आपल्या शेतातच सफरचंदाची बाग फुलवली आहे.
चंद्रकांतने हिमाचल प्रदेश येथील रजित बायोटेक नर्सरीमधून प्रायोगिक तत्त्वावर ५0 रोपे मागवली. त्यानुसार, नर्सरीच्या संचालकांकडून सफरचंद लागवडीविषयी मार्गदर्शन घेतले. लागवड कधी करायची, पाण्याचे प्रमाण, तापमान, औषधे देण्याची पद्धत आदींबाबत योग्य असे मार्गदर्शन घेतले. यासाठी त्याने रजित बायोटेक नर्सरीचे मार्गदर्शन घेतले. सोशल मीडियावर सफरचंद शेतीची पोस्ट आल्यानंतर तालुक्यात अनेक अभ्यासू शेतकर्यांचे पाय चंद्रकांतच्या शेतातील सफरचंदाच्या बागेकडे वळाले आहेत. योग्य नियोजनातून आज प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद बाग फुलल्याने हय़ाळीज कुटुंबीय व गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अभ्यासू शेतकरी घेताहेत माहिती
सोशल मीडियावर सफरचंद शेतीची पोस्ट आल्यानंतर तालुक्यात अनेक अभ्यासू शेतकरी चंद्रकांतच्या शेतातील सफरचंदाच्या बागेची माहिती घेण्यासाठी येत आहेत. अवकाळी पाऊसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सफरचंद लागवडीतून नवीन प्रयोग यशस्वी झाल्यास आम्हीदेखील सफरचंद लागवड करणार असल्याचे स्थानिक शेतकर्यांनी म्हटले आहे.