• Fri. Jun 9th, 2023

नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरित करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी दिले. नाट्य चळवळीसमोरील समस्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
नाट्यनिर्माते आणि नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील नाट्यनिर्माते व नाट्य चळवळीसमोरील समस्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना त्यांनी नाट्य चळवळीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
मराठी माणूस नाटकवेडा आहे. महाराष्ट्राची नाट्यचळवळ राज्याचे सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील नाट्यक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यसरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आहेत. तसेच शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडे सवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्यकलावंतांना शासकीय विर्शामगृहात सवलतीसह प्राधान्य, नाट्यसंस्थेच्या बसेस, टेम्पोंना टोल नाक्यांवर टोलमाफी, बस-टेंपो पार्किंगसह नाटकाचे सेट (संच) ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे आदी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिले. प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना बक्षिसांसह सवलती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नाट्यनिर्मात्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हिसीद्वारे), सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (व्हिसीद्वारे), परिवहन मंत्री अनिल परब (व्हिसीद्वारे), सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल (व्हिसीद्वारे), सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव दिलीप पांढरपट्टे, अभिनेते-नाट्य निर्माते प्रशांत दामले, दिलीप जाधव आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *