रामटेक : जन्माला आलेल्याला एक दिवस जावेच लागते. मात्र, अवेळी काही जणांना मोठय़ा जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागतो. दोन वर्षे वयाच्या बालकावर जर जीवघेणी घटना ओढविली असेल तर त्याच्यासह पालकांची त्यावेळी काय परिस्थिती झाली असेल याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. अशाही परिस्थितीत दैव बलवत्तर असेल तर तो परिस्थितीवर मात करू शकतो. याचा प्रत्यय गावकर्यांच्या प्रसंगावधानामुळे रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) येथील नागरिकांनी अनुभवला.
शिवारात खेळत असताना ५0 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये दोन वर्षाचा चिमुकला पडला. प्रसंगावधान साधून गावकर्यांनी त्या बाळास मोठय़ा शिताफीने सुखरूप बाहेर काढले. नवघान देवा दोंडा (वय २ वर्षे) असे त्या बाळाचे नाव आहे. नवघानचे वडील शिवारात जनावरे चारत होते. त्याबरोबरच त्याचा मुलगादेखील खेळत होता. खेळता खेळता शेतातील एका बोरवेलच्या खड्डय़ात नवघान पडला. इतर मुले रडत होती. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील घटनास्थळी पोहोचले. आईवडिलांचा हंबरडा ऐकून गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्धा तासापासून बाळ पडून होते. गावातील अपघातग्रस्त रक्षक क्रिष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, अमोल वैद्य, अक्षय गभणे तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकर्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकर्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. टॉर्च लावून बाळाशी संपर्क साधला. पन्नास फूट खोलवर असलेल्या बोअरवेलच्या खड्डय़ात दोर टाकून बाळास दोराला पकडण्यास सांगितले. मोठय़ा शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढले. अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले. याबाबतची कल्पना प्रशासनास नाही. मात्र, गावकर्यांनी मोठय़ा हिंमतीने या थरारक प्रसंगाला तोंड दिले.
‘देव तारी त्याला कोण मारी’
Contents hide