नवी दिल्ली : कोव्हिड महामारीच्या संभाव्य आगामी लाटांमध्ये बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये बालकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, असे मत दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नुकतेच केले आहे.
देशात दुसर्या लाटेच्या वेळी बाधित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या बालकांपैकी ६0 ते ७0 टक्के बालकांना एक तर सहविकार (कोमॉर्बिडिटी) होते तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होती. सुदृढ व आरोग्यसंपन्न बालकांना सौम्य लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलीच नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
सामान्यत: श्वसन संस्थेस बाधित करणार्या विषाणूंमुळे निर्माण होणार्या साथरोगाच्या निरनिराळ्या लाटा येतात. १९१८ स्पॅनिश फ्लू, एच वन एन वन (स्वाईन) फ्लू ही त्याची काही उदाहरणे होत. स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट सर्वात मोठी होती. त्यानंतर जरा कमी तीव्रतेची लाट येऊन गेली, असे एम्सच्या संचालकांनी स्पष्ट केले. सार्स-सीओव्ही-२ हा श्वसनसंस्थेशी संबंधित रोग निर्माण करणारा विषाणू आहे, हे आपल्याला माहीतच आहे. सहज बाधित होऊ शकणारी लोकसंख्या असेल तेव्हा अनेक लाटा उद्भवतात. जेव्हा लोकसंख्येचा बहुतांश हिस्सा संसर्गाविरुद्ध प्रतिकारक्षम होतो, तेव्हा विषाणू प्रदेशविशिष्ट होतो व त्याचा प्रादुर्भाव ठराविक ऋतूमध्ये होऊ लागतो – जसे एच वन एन वन प्रादुर्भाव सामान्यपणे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात होताना दिसतो, असे त्यांनी सांगितले. विषाणूमध्ये बदल घडून आल्याने लाटा उद्भवू शकतात. नवीन पिढीचे विषाणू अधिक प्रमाणात संसर्ग पसरवू शकत असल्याने विषाणूजन्य रोगाचा फैलाव वाढण्याची शक्यता बळावते. लाट उद्भवण्याचे एक कारण मानवी वर्तन हेही असू शकते, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
तिसर्या संभाव्य लाटेचा बालकांना धोका नाही
Contents hide