‘जीव माझा गुंतला’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई: प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे विविध रंग आहेत. अशाच एका अनोख्या प्रेमाची काहणी लवकरच कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. ही प्रेम कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे. या प्रेमाला एक रांगडा बाज आहे. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. कलर्स मराठीवर लवकरच सुरु होतेय जीव माझा गुंतला ही नवी मालिका. या मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २१ जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा नात्यांचा, कुटुंबाचा विचार करणारी आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.
मालिकेबद्दल बोलताना, मराठी टेलिविजन प्रमुख, दीपक राजाध्यक्ष म्हणाले, आपण सगळे जवळपास दीड वर्ष भीषण अशा महामारीशी लढतो आहे. ह्या संकटकाळी खरी परीक्षा आहे ती आपल्यातील नाते संबंधांची. नात्यांची विविध रूपं या काळात आपण अनुभवली. नात्यांच्या विविध पैलूंवर विचार करून आणि नात्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोच. ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्‍वभूर्मीवर आधारित जीव माझा गुंतला मालिका एका सुंदर नात्याची वीण घालणार आहे. या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल.
मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!