वर्धा : चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर अज्ञातांनी रॉडने मारहाण करीत हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास सेवाग्राम नजीकच्या खाद्य निगम गोदामालगत असलेल्या रेल्वे रुळालगतच्या परिसरात उघडीस आली. सम्राट ज्ञानेश्वर वाघमारे (३५) रा. म्हसाळा जुनी वस्ती असे मृतकाचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आले. एका सुजान नागरिकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, सेवाग्राम पोलिस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांनी कर्मचार्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले असता सम्राट वाघमारे याच्या डोक्यावर रॉडने मारहाण करीत हत्या केल्याचे दिसून आले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली.
पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सौरभ घरडे, सुमीत कांबळे, सुधीर लडके, श्वानपथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, सिद्धार्थ सोमकुवर यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेतला.
आरोपी पोलिसांच्या रडारवर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार कांचन पांडे दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मृतकाच्या डोक्यावर रॉडने वार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय या घटनेतील आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच अटक करण्यात येईल, असेही ठाणेदार कांचन पांडे यांनी सांगितले.
मृतकावर चोरीचे विविध गुन्हे दाखल
मृतक सम्राट वाघमारे याच्यावर चोरीस दारुविक्रीचे विविध गुन्हे दाखल आहेत. किरकोळ हाणामारीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. शिवाय तीन दिवसांपूर्वीच त्याच्यावर कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ही हत्या चोरीच्या वादातून तर झाली नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सम्राटची हत्या
Contents hide