कोल्हापूर : महापालिकेबरोबर केलेल्या करारानुसार कोल्हापूरच्या प्रवेशव्दारावर एका उद्योगपतीच्या संस्थेच्या नावाचा फलक झळकला, पण कोल्हापूरात त्याचे तीव्र पडसाद उमटताच महापालिकेने तो फलक उतरवला. तीच संधी साधत शिवसेनेच्या वतीने तेथे राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा फलक झळकवला. या निमित्ताने आजी माजी आमदारांतही वेगळीच स्पर्धा रंगल्याचे पहावयास मिळाले.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात येताना जो मुख्य प्रवेश प्रवेशव्दार आहे, त्यावर जाहिराती लावल्या जातात. महापालिका आणि खासगी कंत्राटदार यांच्यातील करारानुसार गेले अनेक वर्षे या फलकावर जाहिरात लावली जाते. दोन दिवसापूर्वी एका उद्योगपतीच्या संस्थेच्या नावाचा फलक लागताच कोल्हापुरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. सोशल मीडियावर त्याविरोधात मोहीमच सुरू झाली. प्रवेशव्दारावर महापालिका अथवा शाहू महाराजांचे नाव असावे अशी मागणी सुरू झाली. सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागल्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी तातडीने महापालिका अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर तो फलक उतरवण्यात आला.
एकीकडे ही सर्व प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तातडीने शाहू महाराजांच्या नावाचा फलक तयार करून घेतला. दुपारच्या आत प्रवेशव्दारावर महाराजांच्या नावाचा फलक झळकला. आजी आमदारांने एक फलक उतरवला आणि माजी आमदाराने तातडीने दुसरा फलक झळकवला. या निमित्ताने या दोन नेत्यांतील स्पर्धाही पहायवास मिळाली.
कोल्हापूरच्या प्रवेशव्दारावर झळकले राजर्षी शाहू महाराजांचे नाव
Contents hide