मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिली ते नववी शिक्षक ५0 टक्के उपस्थिती, उर्वरित शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या मूल्यमापनानंतर आता बारावी परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शालेय जीवन खूप महत्त्वपूर्ण असते. याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरू करता येणे शक्य नाही. या संकटकाळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत, यंदा ऑनलाईन माध्यमातून पहिले ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तकं पीडीएफ स्वरुपात तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सहय़ाद्री वाहिनीवरून इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे राज्य मंडळाने ठरविले. त्याबाबतचे ११ जून २0२१ रोजी शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार दहावीचे मूल्यमापन कसे करावे याबाबत राज्यातील शिक्षकांना शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. त्यांचे निकाल तयार करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावी परीक्षाही रद्द केली आहे. बारावी परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही
Contents hide