कोरोनातून बरे झालेल्यांना बहिरेपणाचा त्रास..!

नवी दिल्ली : एकीकडे कोरोना संसर्गाचा धोका असताना दुसरीकडे त्यापासूनचे साईड इफेक्ट्स अर्थात दुष्परिणामांनी डोके वर काढले आहे. म्युकर मायकोसिसारखे धोके असतानाच आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना दुसर्‍याच एका त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना आता ऐकायला कमी येण्याचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील सरकार रुग्णालयात असे १५ रुग्ण दाखल झाले आहेत, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र त्यांना पहिल्यापेक्षा ऐकण्यास कमी येत आहे.
दिल्लीतील एक खासगी डॉक्टर कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर २१ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर कोरोनावर मात केल्यानंतर ते घरी परतले.
मात्र त्यांना भलताच त्रास सुरु झाल्याचे जाणवले. त्यांना पहिल्यासारखे ऐकण्यास येत नाही. मात्र ऐकण्याची क्षमता कमी कमी होत आहे हे त्यांना इतके उशिरा जाणवले की त्यांना आता र्शवण यंत्राशिवाय ऐकताच येत नाही. उजव्या कानाने त्यांना ऐकायला येणे जवळपास बंद झाले आहे.
राजधानी दिल्लीतील सरकारी आंबेडकर रुग्णालयात गेल्या दोन महिन्यात १५ रुग्ण असे आले आहेत, ज्यांना कानाची समस्या आहे.
एकतर कान दुखत आहे किंवा कमी ऐकण्यास येत आहे. हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे झालेले रुग्ण आहेत. मात्र डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे, कारण हे रुग्ण उपचारासाठी पोहोचत आहेत, तेव्हा खूप उशीर झालेला आहे. या रुग्णांची र्शवण क्षमता पूर्णत: गमावली आहे.
आंबेडकर रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचा कान दुखत असेल, जड वाटत असेल किंवा एखादा आवाज येतोय असे वाटत असेल तर ७२ तासांच्या आत डॉक्टरांना दाखवा. सुरुवातीच्या काळात त्याच्यावर उपचार होऊन, र्शवण क्षमता शाबूत ठेवता येऊ शकते. मात्र जास्त वेळ केल्यास, त्यावर उपचार करणे कठीण होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!