काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार – नाना पटोले

मुंबई : राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये सारेकाही आलबेल असल्याचा दावा तीनही पक्षांकडून केला जात असला, तरी वेळोवेळे नेत्यांकडून केलेल्या विधानांमुळे त्यावर शंका उपस्थित करण्यासाठी मोठी जागा निर्माण होते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीसोबत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर राज्यात भविष्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र दिसतील की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचे आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही सोबत आहोत असे म्हटले आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असे सांगितले, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!