• Mon. Jun 5th, 2023

ऊच्चशिक्षितांची निरक्षर माता राधामाय.!

    डोंगर पायथ्याशी वसलेलं यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधलं करजगांव हे गांव. तसं पाहिलं तर सारं करजगावच राधामायचं गणगोत होतं. गावातील प्रत्येक पुरुष तिच्या नात्यात होता. कोणी तिचा बाप, कोणी भाऊ, कोणी काका, कोणी मामा, कोणी दिर, कोणी भासरा, कोणी सासरा, तर कोणी मुलगा होता. आणि असंच नातं तिचं प्रत्येक बाई सोबतही होतं. भिकारी, म्हाताऱ्या बाया, सासुरवाशिणी सूना यांचं हक्काचं आणि मदतीचं ती आश्रयस्थान होती. गावातल्या प्रत्येकाशी तिचे प्रेमाचे आणि फार आपुलकीचे संबंध होते. सारं गाव तिला प्रेमानं राधु म्हणायचे..!

    जवळपास साडेपाच फूट उंच, तेवढीच अंगात भरलेली, गौर वर्ण, छान आकर्षक चेहरा, नाकी डोळी छान, कपाळावर भलं मोठं कुंकू, (आजीची ही खास ओळख होती) नऊवारी पातळ (लुगडं) यात ती अधिकच खुलून दिसायची. चौदा पंधरा वर्षाची असतानाच राधाचं कृष्णाजी सोबत लग्न झालं.(राधा-कृष्णा हा योगायोग होता) त्यावेळी तिला फारसं कळत पण नव्हतं. कमी वयातच तिच्यावर घरची जबाबदारी आली. आणि दहा-बारा वर्षाच्या काळातच राधु आणि कृष्णाने जीवतोड मेहनत करून, आठ एकर शेत, बैलजोडी पण मागे पाडली. टिनाचं दुतर्फा घर सुद्धा बांधलं. ती फारच कष्टाळू बाई होती. काम कोणतेही असो शेतीकाम, भिंती बांधणे, गिट्टी फोडणे, दगड वेचणे, कापूस वेचणे, त्यात ती अव्वलच असायची. घरचा स्वयंपाक आणि सारी काम आटोपून कामावर जाताना कधी कधी तिचं घरी धड जेवणही होत नसे. अशा वेळेस रस्त्याने चालता चालताच हातावर भाकर घेऊन ती खायची.1956 च्या धर्मांतर चळवळीच्या निमित्ताने तिनं अनेक दलित नेत्यांची भाषणे ऐकली होती. सुधारणेचं आणि शिक्षणाचं महत्त्व तिला कळलं होतं. आपली मुलं सुद्धा खूप शिकावी, मोठी व्हावी. अशी तिची मनातून इच्छा होती. मुलांना वह्या पुस्तके आदि शैक्षणिक साहित्य तिच पुरवायची. मुलं बाहेरगावी शिकायला असताना त्यांचं पैशाचं पत्र आलं की नवऱ्याच्या चोरून जमा केलेल्या दहा वीस रुपयांची मनीऑर्डर करायची. पैसे नसल्यास गावात वनवन भटकून याला त्याला उसने-उधार पैसे मागून मुलांना पैसे पाठवायची. 1966 मध्ये करजगावातील बौद्ध महिलांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता. दलितांना बंदी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरींना बौद्ध महिलांनी हात लावून जबरदस्तीने पाणी भरले होते. त्यामुळे गावात काहीकाळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता. गावकर्यानी दलितावर बहिष्काराचं हत्यार पण उपसलं होतं. राधुच्या नेतृत्वातच हा मानवी हक्काचा सत्याग्रह करण्यात आला होता. तशी ती सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होती.

    राधुला संगीताची फारच आवड होती. तिचे बाबा झांबर्यासाधु एक तार्‍यावर भजने म्हणायचे भाऊ प्रसिद्ध कव्वाल नागोराव पाटणकर सोबत असायचा. म्हणूनच अनुवंशिकपणे संगीत तिच्यात आलं होतं. ती निरक्षर होती परंतु शीघ्रकवयित्री होती. महादेवाचे गाणे, ईनामायचे गाणे, अथवा एखादे गीत आवडत्या सिनेमाच्या चालीवर यमक साधून ती जोडायची. परंतु अशिक्षित असल्या कारणाने तिची शब्दसंपत्ती व ज्ञान कधी-कधी कमी पडायचं.

    घरची गरिबी असूनही 1980 च्या दरम्यान तिने नेल्को तापी कंपनीचा एक रेडिओ दोनशे पन्नास रुपयाला खरेदी केला होता. तिची स्मरणशक्ती विलक्षण होती. एखादं गीत तीन चार वेळा ऐकलं की, तिच्या तोंडपाठ व्हायचं. शेकडो मराठी तसेच हिंदी सिनेमाची गीतं तिच्या तोंडपाठ होती. तिला संगीताचं तसं ज्ञानच नव्हतं, तरी ती जी गीत गायची त्यात दो हंसो का जोडा, तुुुम ही हो माता पिता तुम ही हो, ज्योत से ज्योत जगाते चलो, मन डोले मेरा तन डोले, ढुंडो ढुंडो रे साजना, तुम ही मेरे मंदिर तुम ही मेरी पुजा, दिल के अरमा आसूओंमे बह गये, चल मुसाफिर तेरी मंजिल अशी बहुतेक गाणी भैरवी रागातिल आहेत. तिचा आवाज गोड होता. आणि ती उंच स्वरात गायची. करजगावात भराडी मागायला यायचे तेव्हा हमखास तिला भेटायचे, तिला गाणे, भजने ऐकवायचे. हातोल्याची एक मातंग बाई एकतार्‍यावर सुंदर भजने म्हणायची, तिचा गावात मुक्काम असल्यास तिच्या जेवणाची सोय करायची त्याकाळी महिलांवर जरा जास्तच बंधन होती पण गावातील दंढार, कलापथक, नाटक, कीर्तन, भारुड, भागवत यासारख्या कार्यक्रमाला ती आवर्जून उपस्थित राहायची. गावी परगावी भजनासाठी जायची. माडी पौर्णिमेला पुरुषासारखे कपडे घालून महिलांचं निखळ मनोरंजन करायची. तरीही कृष्णाने तिला कधीच रोखलं नाही एवढी वैचारिक प्रगल्भता निरक्षर असूनही त्यांच्यात कुठून आली होती कळत नाही. राधू निरक्षर होती पण उर्दू मधील अनेक शब्द जसे याद, हुन्नर, पेशेमान, मनसुबा, मिजास, फिकीर, दुष्मान, बरसात, मुश्किल, खुशामत, यासारखे अनेक शब्द तिच्या नेहमीच्या बोलण्यात यायचे कदाचित मुसलमान वस्ती असलेल्या भांडेगावात तिचं बालपण गेल्याचा तो परीणाम असावा.!

    तिच्या कामाचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. नत्थू पाटलाच्या चक्कीवाल्या शेतात एकदा तिने पाच मण कापूस वेचला होता. एकदा तर ती कापसाचे भले मोठे गाठोडे डोक्यावर आणतांना तारावाल्या खारीच्या बेफाटितच अडकली होती म्हणे. मागे जाता येत नव्हते ना पुढे, तितक्यातच रामचंद्र चौधरी मागून आला त्याने तिला गाठोडे जमीनीवर फेकायला सांगितले तेव्हाच तिला बेफटीतून बाहेर निघता आले होते. विशेष म्हणजे नवरा सायंकाळी सात वाजता तिचा कापूस मोजायला नत्थू पाटलाच्या घरी गेला आणि कापूस मोजुन परत येईपर्यंत ती बाळंत झाली होती. त्या काळातील करजगावची बहुतेक दगड मातीची घरे. राधु आणि कृष्णानीच बांधलेली होती. बांधकाम जेव्हा सात आठ फुटावर जायचे त्यावर निव्वळ मातीचे कांडे चढविले जायचे, तेव्हाच त्या कामाचा खरा कस लागे. पांढरीच्या मातीचा गारा (चिखल) जुने गवत टाकून चांगला तुडवला जाई. त्यासाठी म्हैस किवा हेल्याचाही वापर केला जाई. दुसऱ्या दिवशी कृष्णा भिंतीवर चढायचा आणि राधु फावड्याने पेंड तोडून दहा-पंधरा किलोचा पेंड खालून ताकदीने वर फेकायची आणि कृष्णा तो पेंड अलगत झेलायचा हे दृश्य खरोखरच प्रेक्षणीय असायचे येणारे-जाणारे सुद्धा दोन मिनिटं थांबून त्यांचं ते जीवघेणं काम पाहायचे.

    केशवराव धवने यांनी राधुची एक आठवण सांगितली 1982-83 च्या दरम्यान ते राधु आणि कृष्णासोबत चौधरी यांच्या बिडावर गवत कापायला जायचे. गवत कापून त्याची पेंढी बांधण्याचे अंगावरचे काम असायचे. तीन पैसे प्रति पेंढी असा त्याचा दर होता. राधु सकाळी सात ते अडिच वाजेपर्यंत एकाच दिवशी 500 गवताच्या पेंढ्या बांधायची आणि पंधरा रुपये कमवायची.

    कारंज्याच्या कमलाबाई गुडदेने तिचा एक किस्सा सांगितला, त्यावेळी महारपुर्यातील बहुतेक जावई सुगीसाठी करजगावात यायचे कारंज्याच्या बर्डी वरचा भीमराव हा कामाला फारच काहूर होता. चौधरीच्या मोठ्या वावरात भुईमूग पेरला होता तेव्हा त्याने राधु सोबत भुईमूग उमटण्याची शर्यत लावली. पाच तासाची ओळ होती. शर्यत सुरू होताच त्याने ओटे खोसून भुईमुंग उपटायला सुरुवात केली. राधूने त्याला जवळपास शंभरेक मीटरपर्यंत जाऊ दिले, नंतर तंबाखू घोटून तोंडात टाकला. लुगड्याचा पदर खोसला आणि भुईमुंग उपटायला खाली वाकली पात अर्ध्यात जाईपर्यंत थांबलीच नाही. तो पाहातच राहिला आणि म्हणाला “ही बाई आहे कि राक्षसीन,भुतीन कारंज्याच्या कोणी कामात माझा हात धरत नाही पण ही तर माझ्यापेक्षाही कामात वरचढ आहे.” दिवसभर कामाने थकून आल्यानंतर घरची सारी काम आटोपल्यानंतर रात्री झोपतांना ती रोजच शेकडो देवाची नाम नित्यनेमाने घ्यायची.”देवा बाप्पा सगळ्या दुनियेचं भलं कर, त्याच्या मागोमाग माह्य भलं कर “असा त्या नामस्मरणाचा समारोप असायचा. 1970 पासून सततची नापिकी, दुष्काळ, खाणारी अनेक पोटं त्यामुळे झालेला कर्जाचा डोंगर यापायी शेत विकावे लागले. बैलजोडी गेली. घरावरील टिनं विकावे लागले. तशातच कृष्णाला दारुचं व्यसन जडलं. या सर्व कारणाने कुटुंबाचा गाडा हाकता हाकता तिची फारच दमछाक व्हायची. परिणामी तिच्या काही मुलींना शिकवता आलं नाही. याच दुष्काळाच्या काळात ती मारवाड्याच्या घरी जाऊन झाडलोट करायची. तेथील शिळंपातं आणून आपल्या चिल्ला पिल्लांना भरवायची. घरात अठरा विश्र्व दारिद्र्यातून तिने मुलांना उच्चविभूषित केले. विशेष म्हणजे राधुच्या मृत्यूनंतर तिची मुलं खुप शिकलित. मोठा मुलगा प्रा. रमेश कृष्णाजी वरघट एम. ए. बी. एड्. एम. फिल. होऊन 32 वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. मुलगी निमा सोनावने ही एम. एस्सी. एम .फिल .पी.एच.डी, एम. बी. ए. असून सध्या मुंबईला प्राचार्या म्हणून कार्यरत आहे. आणि लहान मुलगा अर्जुन कृष्णाजी वरघट हा एम. ए .एम .एड.( इंग्रजी ) असून सध्या तो मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तीनही भावंडे शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांना सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाचा बहुमानाचा समजला जाणारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा दोन्ही भावंडांना मिळाला हे विशेष उल्लेखनिय आहे.

    जानेवारी 1985 पासूनच तिला थोडा थोडा ताप येत होता. हातापायात मुंग्या यायच्या, जीभ जाड व्हायची, तोत्तरे बोलायची, अंगाला थरथरी सुटायची, तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा उंबर्डाबाजार, दारव्हा, यवतमाळ, अकोला येथील सरकारी दवाखान्यात उपचार केले. गरिबी होती, पैसे नव्हते. तरीही गावातील नासरू कारभारी, थाऊ सपावट, पांडुरंग ठाकरे, शेषरावजी ठाकरे, शंकर चिपडे यासारख्या लोकांनी काही आर्थिक मदत केली. खाजगी दवाखाने पण केले. शेवटी मंगरूळपीरला मोठ्या मुलीकडे आणले. त्यांनी तिची खूप सेवा केली. तेथील सारेच सोयरे तिला धीर द्यायचे. जेव्हा तिला वेदना व्हायच्या तेव्हा मोठमोठ्याने ओरडायची. परंतु शिकत असलेल्या मुलांना बोलवु देत नव्हती. “त्यांना बिमारिचं सांगू पण नका त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल” असं म्हणायची. अखेर अत्यवस्थ झाल्यावर रमेश, निमा, अर्जुन अशी नावे घेऊन कपड्यांनाच कवटाळायची. बेशुद्धावस्थेत ही दादा आला म्हणताच डोळे उघडायचा अयशस्वी प्रयत्न करायची. अखेर तिला आपलं मरण कळलं होतं. तेव्हा तिनं सांगितलं मला करजगावी घेऊन चला, मला सोयर्यांच्या गावी मरायचे नाही. म्हणून टॅक्सी करून तिला गावी आणले आणि 21 जून 1985 ला सर्वांनाच पोरकं करून राधु अवघ्या ४४ व्या वर्षी निघून गेली. एका कष्टाळू , संगीताला वाहून घेणाऱ्या, लेकरांच्या शिक्षणासाठी झटणार्‍या, गावातील सर्वांनाच हवीहवीशी वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा, ऊच्चशिक्षितांच्या निरक्षर मातेचा शेवट झाला.

    शब्दांकन- बंडूकुमार धवणे

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “ऊच्चशिक्षितांची निरक्षर माता राधामाय.!”
  1. कालकथित राधाईला विनम्र आदरांजली. तिच्या संघर्षाला मानाचा जयभीम. खुप सुंदर लेखन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *