यवतमाळ : हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमत्त १ जुलै रोजी कृषी दिनापासून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलैपयर्ंत आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यात ‘घर, आंगण चंदन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात किमान पाच हजार नागरिकांना चंदनाचे प्रत्येकी एक झाड देण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात चंदन वृक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. यवतमाळलगतच्या उमरठा, जामवाडी जंगलात एकेकाळी बरीच चंदन वृक्ष होती. जिल्ह्यातील चंदन वृक्षांचा हा ठेवा जपला जावा आणि प्रत्येक घरी एक तरी चंदनाचे झाड लावावे, या उद्देशाने संजय राठोड यांनी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात चंदनाची रोपे वनविभागाकडून तयार करवून घेतली. चंदनाच्या झाडाचे योग्य संगोपन आणि संवर्धन करून हे झाड वाढविल्यास ते पोक्त झाल्यानंतर त्यापासून मोठय़ा प्रमाणात अर्थार्जन घेता येईल, हा हेतूसुद्धा या उपक्रमामागे असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो.
त्यामुळे या दिवसापासून ‘घर-आंगण चंदन’ उपक्रमाची सुरूवात होणार आहे. तर पर्यावरणस्नेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापयर्ंत २७ जुलैपयर्ंत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे चंदन वृक्ष संवर्धनास गती मिळेल, असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला. मात्र, या अभियानात जो नाव नोंदणी करून चंदन वृक्ष संगोपन व संवर्धनाची हमी घेईल, त्यांनाच चंदनाची रोपे वितरित करण्यात येणार आहे. या नाव नोंदणीसाठी संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय किंवा शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधता येईल. चंदनाच्या अध्यात्मिक, धार्मिक, औषधीयुक्त गुणधर्मांसह त्याच्या सुवासामुळे घराच्या परिसरातील वातावरण नेहमीच आनंददायी, आरोग्यदायी व आल्हाददायक राहते, त्यामुळे या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन, चंदन संवर्धनास सहकार्य करण्याचे आवाहन संजय राठोड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आ. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून ‘घर-आंगण चंदन’ उपक्रम
Contents hide