अखील विश्वाचा प्रवास करून,
लाखो खाचखळग्यातून चालतांना...
तृष्णेच्या कोटी कोटी दगडांना ठेचाळून
रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं !,
आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहेत !
त्यांना तुझेच जीणे जगायचे आहे ,
काळोखातून प्रकाशाकडे जाणारे दुःखमुक्त !
शब्दांच्या पलीकडील तुझ्या विज्ञानवादी दुनियेत सामील व्हायचे आहे ,
पंचशीलेचा धम्मध्वज खांद्यावर घेऊन !
अगणित वेदनांना तुझ्या करुणेचा ओलावा मिळेल या अपेक्षेने आणि
अंतर्बाह्य शुद्ध होण्याच्या निर्व्याज हेतूने ..!
तुझ्या विचारांचे वाहक होण्यासाठी
भरकटलेली पावलं आता तुझ्याकडेच येत आहेत शांतीदुता ...!
तेव्हा बोधीवृक्षाच्या ज्ञानरुपी छायेखाली
त्यांच्यासाठी दोन पावलांची जागा रीती ठेव ..!
तथागता !
अनादी काळाच्या काळोखाशी नाते तोडून 'मी उजेडाच्या दिशेनेच निघालो आहे ' !
- अरुण विघ्ने
0 टिप्पण्या