Recent in Technology

Advertisement

Breaking News

जीवन संघर्ष

खरे म्हणजे जगण्या इतके आनंद दायक जिवनात काहीच नसते आणि असूच शकत नाही.  माणसाने जगता जगता जीवनाकडे पहावे. जमेल तेवढे जाणावे . या जाणिवेचे  गाणे गुणगुणत पुढे पुढे जावे. माणूस जन्माला येतो, जीवन जगतो, जगण्याच्या या अवधीतच त्याला त्याच्या स्थिती  परिस्थिती प्रमाणे कडू गोड त्रासदायक अनुभव येतात .  त्यातून तो मार्ग काढतो.  ह्या जीवन प्रवासाला तो आपल्या अनुभवाप्रमाणे संघर्षपूर्ण,  दुःखदायक,  सुखकारक 'जीवनाची' व्याख्या करतो.
          कवी नवनाथ रणखांबे यांचा  'जीवन संघर्ष' पहिला  काव्य संग्रह मी वाचला . ह्या संग्रहात एकूण ४६ कविता वेगवेळ्या स्वरूपात दिसून येतात.  ह्यात त्यांचे अनुभव सर्वस्व दिसते.  ह्या काव्यासंग्रहात पर्यावरण, जातीवाद, दुष्काळ, भ्रष्टाचार, प्रेम आणि विरह,  ( विश्वास - अविश्वास) अशा अनेक स्वरूपाच्या कविता त्यांनी शब्दांकित केल्या आहेत .
         परीक्षक , समीक्षक या दृष्टीने नव्हे तर एक वाचक ह्या दृष्टीने मी  ह्या संग्रहातील कवितेबद्दल बोलत आहे. आई या विषयावर अनेक विद्वान साहित्यिकांनी सुंदर शब्दात आईची महती गायलेली  आहे पण कवी नवनाथ यांनी आईचे दर्शन असे घडवले उदा.
माय,  तुला मी पाहिलय 
         तुला मी पाहिलय
गरिबीलाच लाज वाटली गरिबीची
जीवनाला उपासमारी होती जगण्याची
सोबतीला हिम्मत रित्या हातांची 
 ...........माझ्या स्मृतीने
त्या  हिंमतीला माय, त्याला मी पाहिलय
त्याला मी पाहिलय
त्याला मी पाहिलय

डळमळून न जाता....
मोलमजुरी करत दुःखांनी.....
काळरात्र होतीस कापली ! 
 
या कवितेत  'आभाळ फाटताना' ,  'गरिबीलाच लाज वाटली गरिबीची' ,  'काळ रात्र कापताना',  'कष्टाने तुझ्या डोंगर उचलताना' , ( असे शब्द) ह्या ओळी आईच्या स्वरूपाचे साध्या सुध्या  शब्दात  कवी करतात. पण डोळे पाणवतात.
तुझ्या जीवन संघर्षाचा,
संग्राम पाहून.....
काळ स्तब्ध  झाला  अन.....
संघर्ष गहिवरला.....ओथंबलेल्या डोळ्यांनी
................ ढसा ढसा रडला!

तू लढताना न्यायासाठी
माय  तुझ्यात मी मलाच पाहिलय,

या कवितेतील शब्दांचे पूर्ण:  लेखन आईचे  महत्त्व एक वेगळ्या रुपात दर्शवते .
         शब्द अर्थ अलंकाराचे ओझे न पेलणारी पण भावगर्भित  भावाअभिव्यक्ती कवीने आपल्या काव्यात केलेली दिसून येते.  उदा. पृष्ठ क्र. २१,  ती कविता   'बानं शिकवलं' 
'बा'  माझा ओरडला
लेका आज पासून तुझी
शिक्षण हीच  'आई'
करियर हाच  'बा'
मुंबई हीच  'पांढरी'
परत आला माघारी
तर  तंगडं तोडीन........
करियर करून आल्यावर 
पारावर तुझा बॅनर लावीन
चावडीवर सत्कार ठेवीन 
वाजत गाजत मिरवणूक काढीन !

शिक्षण वाघीनीचं दूध आहे
भीमाच्या चळवळीचा गाभा आहे
लोकांसाठी तुझं..........
जगणं हेच तुझे जीणं  आहे.
भीमाच्या  चळवळीचं........
नवनाथा  शिलेदार  तुला बनणं आहे ! 
ह्या संवाद पूर्ण साध्या ओळीत ( मनात) डोळ्यासमोर चित्र उभे करतात.
     भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती यांचे दुःख दारिद्रय ज्या ठिकाणी पोटाचा प्रश्न सुटला नाही.  त्या समाजाची देशाची उन्नती कशी  शक्य आहे. सामाजिक, आर्थिक, विषमतेचे दुःख दृश्य पृष्ठ - २६  कविता 'भटकंती पोटाची अधोगती देशाची' 
उदा. 
अजूनही आहे बाजारबुनग्यांची......
सामाजिक भटकंती पोटाची, 
पिढ्यानपिढ्या वंचना त्यागाची......
पोटाच्या जीवन संघर्षाची, 

पृष्ठ क्र.  - २८  कविता 'उपाशी पोटं' ह्या कवितेतील 
श्रद्धा मानवाला बोले 
डोईवरी मूर्ती पाषाणांच्या.....
तेल दूध  तूप व्यर्थ गेले, 
श्रद्धेने मानवाच्या.....
जगी अंधश्रद्धेत रूपांतर झाले !

बचत मानवाला बोले 
अन्न कचऱ्यात असे
तुम्ही नासाडी करता कसे !
 
उपवास मानवाला बोले
उपवास आजही..... उपाशी पोटं करतात
उपाशी दिडविताच्या पोटासाठी.....
जीवन संघर्ष करतात,
उपाशी पोटं आजही....
भुकेच्या तृप्तीला शोधतात ! 
या कवितेतील प्रत्येक शब्द मनात घर करते. मन सुन्न होतं.
कमीत कमी शब्दात मोठ्यात मोठे  विपरीत दिग्दर्शन निर्मिती या कवितेत  दिसून येते. 
       बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका,  संघटित व्हा,  संघर्ष करा. या शिकवणीकीपासून प्रेरणा घेऊन   कवीने अन्यायपूर्ण व्यवस्थेशी सतत झगडत हिमतीने आशा ठेवून आई बाबा , शिक्षक गुरू, समाज गुरू या सर्वांच्या प्रेरणेने  आपला मार्गक्रमन केला. म्हणतात ना केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे.  ध्येय डोळ्यापुढे असले की व्यक्ती कोणत्याही स्थितीपरिस्थित आपले शिखर गाठू शकतो. असा आशावादी विचार  त्यांची कविता चित्रित करते.
           निसर्गाच्या अनेक वृत्तीप्रवृत्तीचे चित्रणही त्यांच्या कवितेत दिसून येते.  पर्यावरणाशी आम्ही छेडछाड करू नये. अशी शिकवणूकही त्यांची कविता देते.  उदा. पृष्ठ क्र.१८ कविता   'पाऊस पेरणी'  ह्या कवितेतील 

झाडे म्हणजे श्वास ! श्वास म्हणजे जगणे!
पाऊस म्हणजे पाणी ! पाणी म्हणजे जीवन !

मानवा सांगतो ऐक......
झाडे लावा रानोरानी,
त्यांचे संगोपन घरोघरी !
पाणी उडवून जिरवा,
पाणी पुरवून उरवा,
भूजल पातळी वाढवा !
जल चक्रास, निसर्ग नियमास, करा मदत.....
पडण्यात मला मज्जा येईल 
पूर्ण तुमची इच्छा होईल !
*ह्या पुस्तकातील पहिली कविता 'ऋण'  आणि अंतिम कविता 'जीवन'  असून ह्या संग्रहातील सगळ्या कविता वाचनीय आहेत*.
     पृष्ठ क्र. ४१ कविता 'डॉ.आंबेडकर' .  बाबासाहेबांच्या कर्तृत्व गुणांची गोड गाणी वाटावी अशी ही कविता पहा
बाबा या दुनियेचा स्वाभिमान
जागृत केलात...... 
पिढ्यानपिढ्याचे शापित जिणं 
लाथाडलत........
शिका ! संघटित व्हा !!  संघर्ष करा !!!
संन्मार्ग दिलात...... 

बुध्दांना करून आत्मसात
युद्ध मार्ग न दाखवता,
शांती मार्ग दाखवलात,
नवा प्रकाश.... प्रगतीचं विश्व...मोकळं केलत 
सर्वात मोठ्या संविधानाने,
रक्तपात न करता..... 
लेखनीच्या स्वतंत्र क्रांतीने,
नवा इतिहास घडवलात.... 
सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष, 
गणराज्य घडवलत.....
स्त्री पुरुष सर्व धर्माला देशात,
न्याय दिलात.....
------ युगपुरुष त्राता बाबा तुम्ही ! 
संस्कृत मध्ये एक म्हण आहे  'मुंडे मुंडे   मर्तिर  भिन्ना'  ह्या म्हणी प्रमाणे कवी नवनाथ रणखांबे ह्याच्या कवितेबद्दल वेगवेगळी मते होऊ शकतात. मला या काव्यासंग्रहात सगळ्यात जास्त आवडलेली कविता 'मात' नावाची आहे.  पृष्ठ क्र. ६६ ,  कविता 'मात'
संघर्षाने शिकवलं माझ्या, 
जीवनाला जगायला
हिमतीने माझ्या कष्ट करायला  
स्वप्नाने माझ्या पूर्ण करून घ्यायला 
दुःखाने माझ्या पचवून संकटावर  मात करायला
आनंदाने माझ्या यशस्वी उडी  मारून जगायला
जगण्याने माझ्या माणसं ओळखायला
जीवनाने माझ्या मनं  जिंकायला
संघर्षाने दिलं माझ्या,
जगणाऱ्या जीवनाला 
काळा कुट्ट काळोख, मशाल बनून पेटवायला
मोकळे आकाश, उंचावर भरारीने जायाला
यशाचं शिखर, उंचावर ऐटीत बसायला
ही शब्द फुलांची  सुवासिक सुंदरमाळ कवीने साध्यसुध्या शब्दात जीवन जगण्याचा अमृत मंत्र देणारी अशी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ गरुड पक्षाची भरारी  संघर्षाला मात देणारी आहे,  पक्षाच्या पायाखालाच काळा रंग जीवनातल्या अंधारमय परिस्थितीचे प्रतिक असून, पक्ष्याच्या समोरचा चंद्र शितलचे प्रतिक म्हणून पाहू शकतो. पक्षाची दृष्टी जीवन फुलवणारी जगाकडे आशाने पाहणारी दृष्टी अत्यंत वेधक अशीच आहे. वरील कवितेप्रमाणेच कवीने समाज्याच्या सकारात्मक प्रकाशित पक्षाकडे सतत  दृष्टि ठेवावी.  ही सदिच्छा व्यक्त केली आहे.  त्यांचे शतशः अभिनंदन ! असेच सतत लेखन करून  साहित्य क्षेत्रास समृद्ध करावे . पुन:श्य स्नेह  अभिनंदन ! 

पुस्तक  :-  जीवन संघर्ष
कवी -:   नवनाथ रणखांबे
प्रकाशन  -:  शारदा प्रकाशन ठाणे

पुस्तक परिक्षण लेखिका :-    
से.नि. प्रा.डॉ. लीला  (मोरे ) धुलधोये
मोबाईल -: ७५६६९६६२५२ / ७०००८३६६५६
संस्कृत महाविद्याल ( रामबाग) 
इंदोर,  मध्यप्रदेश राज्य 
पिन - ४५२ ००४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code