Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

माझ्या 'कहाणी'चे रस'ग्रहण'...!

|| कहाणी ||
वृत्त - मंजुघोषा
(लगावली - गालगागा X 3)

दु:ख नाही घात केला मुखवट्यांनी;
ऐकली ना हाक माझी चेह-यांनी.

पाखरांना राहण्याची सोय कोठे?
घाण केली जीवघेणी माणसांनी.

काय सांगू मी कहाणी जीवनाची?
तारले, सांभाळले मज वेदनांनी.

राजकारण कुरण झाले बारमाही;
लोकशाही फस्त केली गाढवांनी.

सूर्य अमुच्या एकतेचा उगवलेला;
चालते व्हावे जिहादी काजव्यांनी...!

- मिलिंद देविदास हिवराळे
'अस्मिता', ४०४ क, सादिक नगर,
मु. पो. ता. बार्शिटाकळी, जि. अकोला - 444401
भ्र. 7507094882
ईमेल : milindhiwarale@yahoo.com

रसग्रहण :
गज़ल ही इस्लामी संस्कृतीकडून मिळालेली देणगी. मात्र हा वृत्तप्रकार असला तरी काव्य व गायन प्रकारही असल्याने मराठीत सुगम गायन प्रकारात गज़लचा समावेश होतो. मराठीतही अनेक दिग्गजांनी हा गज़ल प्रकार लिलया हाताळला व रसिकांनी डोक्यावर घेतला. प्रेम, विरह या पलिकडे आजच्या पिढीने त्यास नेले असून प्रत्येक विषय गज़लबध्द होताना दिसत आहे.
आजच्या पिढीचे नव्या दमाचे कवी मिलिंद हिवराळे हे आपली अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नोकरी सांभाळत गज़ल काव्य प्रकार छंद म्हणून हाताळत आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला हे नाव आता परिचित झाले आहे.
आपल्या वेगळ्या विषयावरील गज़ल प्रकारातील
'कहाणी' या गज़लेत रसिकांना सध्याच्या ज्वलंत समस्येवर विचार करायला लावतात. मंजुघोषा या वृत्तामधील गालगागा गालगागा गालगागा लगावलीतील ही एक चांगली गज़ल म्हणावी लागेल.
दु:ख नाही घात केला मुखवट्यांनी;
ऐकली ना हाक माझी चेह-यांनी.
हा मतलाच पुढील शेरमध्ये काय असेल याची उत्सुकता लावून जातो. प्रत्येक व्यक्ती समाजात वावरताना एक मुखवटा लावत असते आणि गज़लकार नेमक्या त्याच वर्मावर बोट ठेवतात की, दुःख त्या मुखवट्यांनी घात केला या गोष्टीचे नाही; तर माझी हाक ही एकाही मुखवट्याआडच्या प्रामाणिक चेहऱ्यांनी ऐकली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हा मुखवटा आला असेल आणि त्याच्या वेदना प्रत्येकाने भोगल्या असतीलच. त्यामुळे हृदयात हात घालणारा हा मतला या गज़लेची जान झाला आहे.
पाखरांना राहण्याची सोय कोठे?
घाण केली जीवघेणी माणसांनी.
पहिल्याच शेरमध्येे माणसांची स्वार्थी प्रवृत्ती उघडवून दाखवतात. मानवाचा स्थायीभाव या स्थायी शेरात आला आहे. माणसांची गर्दी, लोकसंख्या वाढ व इतर प्रगतीच्या नावाने होणारा निसर्ग ऱ्हास याकडे बोट दाखवतात की, माणसांनी घाण केली पण तीही कशी तर जीवघेणी आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अनेक प्रश्न उत्पन्न झाले आहेत; मात्र गज़लकारांनी येथे वेगळाच प्रश्न विचारला आहे की, पाखरांनी कोठे रहावे?, त्यांची सोय काय? हे वरवरचे प्रश्नं वाटले तरी पाखरांआड आठवणी व बालपण यांचा कोंडमारा देखील मला जाणवतो. तो विचार सुरू असताना पुढील शेर नजरेसमोर येतो.
काय सांगू मी कहाणी जीवनाची?
तारले, सांभाळले मज वेदनांनी.
आयुष्य किंवा जीवन म्हणजे काय? याचे प्रत्येकी उत्तर हे वेगवेगळे येईल. काहींचा सुखद तर काहींचा दुःखद अनुभव असेल. गज़लकारांनी स्वतःच्या आणि अनेक वंचितांच्या जीवनाची कहाणी या अंतरामधील शेरात सांगितली आहे; ती म्हणजे मला (व वंचितांना) तारले व सांभाळले तर कोणी? तर माझ्याच वेदनांनी! यासारखी जीवन कहाणी कोणी मांडूच शकणार नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
राजकारण कुरण झाले बारमाही;
लोकशाही फस्त केली गाढवांनी.
हा शेर तर लोकशाहीची वाट कशी लागली याचे डोळ्यांत अंजन घालणारा आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणि आजची अंमलात असलेली लोकशाही यात पूर्णपणे फसगत झालेली दिसत आहे. लोकशाहीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही स्वार्थी व मतलबी झालेली आहे. हीच बाब हेरून राजकारण व लोकशाही याबाबत मिलिंदजी लिहतात. बारमाही कुरण म्हणजे हे राजकारण आहे. अर्थात समाजसेवा न करता पोट भरण्याचे साधन झाले आहे. त्यामुळे जी लोकशाही आहे ती या गाढवांनी (पोटभरू राजकारणी) फस्त केली आहे. फस्त करून यांचे पोट भरले नाही आणि साधा ढेकरही ते देत नाहीत. देशाची विदारकता या शेरमध्ये मांडली आहे. बुध्दिवंतांनी राजकारणात यावे व लोकशाही तारावी असेही नकळत ते सुचवतात असे मला वाटते.
सूर्य अमुच्या एकतेचा उगवलेला;
चालते व्हावे जिहादी काजव्यांनी...!
गज़लेची सांगता या अखेरच्या शेराने ते करतात. यात 'जिहाद' हा अरबी शब्दप्रयोग करतात. जिहाद हा शब्द आता बदनाम झाला आहे. वास्तविक पाहता जिहाद हा प्रशंसनीय उद्देश ठेवून प्रयत्न करणे, त्यासाठी इतरांशी संघर्ष करणे यासाठी आहे. सोप्या भाषेत अंतरीची हाक यासाठी जिहाद म्हणता येईल. कुराणात देखील सैन्य संदर्भात हा शब्द आलेला नाही. मात्र आज हा चांगला शब्द वाईट हेतूने वापरला जातो. नको त्या गोष्टीला विरोध करणारे व स्वतःस 'जिहादी' म्हणून घेणारे लोकहो, तुम्ही खरे तर काजवे आहात; तुमचे अस्तित्व हे काहीच नाही. आता आमच्या एकतेचा सूर्य उगवला आहे. समाज एक होण्याची ही वेळ आली आहे. समाज एक झाल्यावर काय होते हे सध्या आपल्या राज्यात आपण अनुभवत आहोतच; त्यामुळे या अशा काजव्यांना चालते व्हा म्हणायची वेळ आली आहे.
अतिशय मार्मिक अशी सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी मिलिंद हिवराळे यांची गज़ल प्रत्येकास नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही...!

- किशोर झोटे, औरंगाबाद
भ्र. 9423153509
.....................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code