• Mon. Jun 5th, 2023

बालदोस्तांसाठीची धम्माल कविता : हसरी फुले

घर कसे ही असले तरी त्या घराला अंगण आणि अंगणात आनंदाने खेळणारी मुले असतील तर त्या घराचा स्वर्ग निर्माण होऊ शकतो. घराला घरपण येते. ही लहान मुले नभांगणातल्या ता-यांसारखी आणि वेलींवरच्या फुलांसारखी असतात. आनंदाने बहरत असतात, फुलत असतात आणि वाढतही असतात. म्हणूनच कवयित्री डाॅ. सौ.शुभांगी गादेगावकर या मुलांना हस-या फुलांची उपमा देतात. त्यांची ही कविता म्हणजे बालदोस्तांसाठी धम्माल उडवणारी आहे.

डॉ. शुभांगी गादेगावकर या ठाणे जिल्ह्यातील असून भाईंदर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. बन्याच्या गमतीजमती हा बालकथासंग्रह तर आशेची पालवी, चूक कोणाची?, मला रक्त हवंय, या कादंब-या, अपूर्व रंगावली इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या बालकथेस मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
 घरात असता हसरे तारे.. पाहू कशाला नभाकडे हे गीत आपण खूपदा ऐकलेले आहे. कवयित्रीची कविता याच आशयाची आहे. बालकांच्या बाल अवस्थेची ओळख करून देत मुलांना मनोरंजनातून प्रबोधनही करतात. कवयित्री म्हणते, निसर्ग बालकाला नेहमीच खुणावत असतो. झाडे, वेली, भिरभिरणारी फुलपाखरे ,चिमण्या, काळे काळे ढग, वेलींवरची फुले, जत्रेतली खेळणी, घरातली लहान मनीमाऊ त्याला हवी हवीशी वाटतात. यात ते रममाण होते. आनंद लुटण्याचा प्रयत्न करते .या लहान मुलांच्या मनातली भावना कवयित्री कवितेतून सागण्याचा प्रयत्न करत आहे.
*फुला फुला फूल रे*
*वा-यासंगे डूल रे*
मनामनातून हसणारे हे फूल त्याला हात लावले तर घाण होईल. अशा फुलांना त्रास देऊ नका. असे कवयित्री फुलांची उपमा देऊन मुलांसाठी लिहिते.
भातुकलीचा खेळ मांडणारी ही निरागस मुले आनंदाने खेळताना भान हरपून जातात. तल्लीन होऊन जातात. मोबाईल खिशात ठेवणे म्हणजे जग खिशात ठेवल्यासारखे वाटते. म्हणजे मोबाईलवर जगाची माहीती लवकर मिळत असते. नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे कवयित्रीला वाटते. नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करूया. नवी क्रांती घडवूया असे वाटते.
*मोबाईलवर शिका तुम्ही*
*घरबसल्या खूप काही*
*मोबाईल ठेवा खिशात*
*जग आपल्या हातात*
संपूर्ण जगाला भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पर्यावरण -हासाचा. पर्यावरण बिघडल्यामुळे माणसांच्या जीवनचक्रात कसा बिघाड होत आहे. त्याकरिता पर्यावरण चळवळी उभारल्या पाहिजेत. आज कोरोनाच्या विषाणूचा उपद्रव वाढला. शुद्ध हवा मानवाला मिळत नाही. वृक्षसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यास खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कवयित्री वृक्षांचे महत्त्व मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे.
*झाड देते छाया*
*ठेवा निर्मळ काया*
*फळ देतात मधुर रस*
*जीवन करा तुम्ही सरस*
निसर्गाची ओळख करून देतांना पाखरांच्या आवाजांची ओळख करून देते. कावळा काव काव, चिमणी चिवचिव, कबूतर गुटरगू, कोकीळ कुहूकुहू असा आवाज मुलांना गोड वाटतो. मुलं तशीच अनुकरण करत असतात. मुलांना स्वप्न पडतात पण सकाळी ती स्वप्ने खोटे वाटू लागतात. स्वप्नात लाॅटरी लागून करोडपती झाला आणि सकाळी उठल्यावर काय तर आहे त्या ठिकाणीच.
*स्वप्नात लागली लाॅटरी*
*भरुन गेली तिजोरी*
*स्वप्न दिसले सुंदर मोठे*
*सकाळी कळले सगळेच खोटे*
शेतात राबणारा शेतकरी, दवाखान्यात राबणारा डाॅक्टर, शाळेत राबणारा शिक्षक हा कसा असतो हे मुलांना विचारत कवयित्री उत्तरे काढून घेते. तर मन किती चपळ आणि एका जागेवर कधीच बसत नाही. त्याला ताब्यात घेणेही खूपच अवघड काम. सैरावैरा फिरणा-या स्वच्छंदी पाखरांसारख मन असते. म्हणूनच मुलांना मनाबद्दल कवयित्री सांगते. बहिणाबाई चौधरी यांनीही मनाला उभ्या पिकावर धाऊन जाणा-या ढोरांची उपमा दिली आहे. अशी मनाची अवस्था असते.
*मन स्वैर पाखरु*
*कसे त्याला आवरु*
नव्या आशा, नवी उमेद घेऊन आपण जीवन आनंददायी जगले पाहिजे. या जीवनाचे नवे गीत आपण गाऊया अशी कवयित्री लिहिते. नदीच्या प्रवाहासारखे आपले जीवन वाहत असते. निसर्ग चक्र सोबत घेऊन जगत असते. आपणासही असेच जगावे लागते.
*झुळझुळ झुळझुळ नदी वाहते*
*सळसळ सळसळ करती पाने*
*आनंदाने आपण गाऊ*
*नूतन जीवन गाणे*
‘जाण’ या कवितेतून कवयित्री आपण सुजाण नागरिक असल्याचे सांगते.आपण संस्कारक्षम, सुविचारांच्या आणि सुजलाम भूमीत जन्मलेले आहोत. नागरिक कसा असावा असे कवयित्री लिहिते.
*कर्तव्याचे करावे पालन*
*अधिकारांचे सदैव रक्षण*
*लोकशाही सुराज्याचे अस्त्र*
*शिकवते नागरिकशास्त्र*
राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे. मांडवासारखा एकत्र हा देश विविध जातीधर्मात बांधला गेला आहे. एकात्मतेची ही बांधलेली मूठ कधीच सोडता कामा नये.आपण सगळे एकाच मातेची मुले आहोत.
*भिन्न जाती, भिन्न धर्म*
*भिन्न असती जरी कर्म* *सगळ्यांची एकच माता*
*भारत भूमी असे विधाता*
हसत खेळत मुलांना आनददायी प्रवाहात आणण्यासाठी कवयित्री प्रयत्न करते आहे. कारण बाल अवस्थेतच बालकांना योग्य वळण लावता येते. योग्य संस्कार आणि ज्ञान दिले तर देशाचा पाया मजबूत होईल अशी आशा कवयित्रीला वाटते. डॉ. मधुसूदन घाणेकर यांची प्रस्तावना आहे. मुखपृष्ठ पूजा बागूल यांनी रेखाटले आहेत. आतील चित्रे डॉ. शुभांगी व कु.ओम गादेगावकर यांनी रेखाटली आहेत. कवयित्रीच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा!
प्रा. रामदास केदार
९८५०३६७१८५
हसरी फुले
(बालकाव्य)
डॉ.शुभांगी गादेगावकर
९६१९५३६४४१
समीक्षा पब्लिकेशन्स
पृष्ठे ६०,किंमत १२०
(कुरिअर सह मूल्य १२० रू.)
गुगल पे नं ९८६९१५८७६०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *