• Fri. Jun 9th, 2023

दूरसंचार कोरोनाकाळात ठरते आहे वरदान.!

संचार लॅटिन शब्द communication मधून घेण्यात आला आहे. टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी १७ मे १८६५ ला इंटरनॅशनल टेलीकॉम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. या निमित्ताने हा दिवस १९७३ पासून साजरा होऊ लागला. मात्र २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होते गेले. या श्रेणीत मोबाईल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत ‘जागतिक दूरसंचार ‘ नावाने साजरा होणारा.
हा दिन जागतिक दूरसंचार व माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २००६ मध्ये घेण्यात आला. तेव्हापासून हा दिन दरवषी १७ मे ला साजरा होत आहे.
एक संचार जो केबल, टेलिग्राफ किंवा प्रसारणाद्वारे दुरून केला जातो त्याला दूरसंचार म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर आम्ही म्हणू शकतो की, हे सिग्नल, संदेश, शब्द, लेखन, प्रतिमा आणि ध्वनी किंवा कुठल्याही प्रकारच्या माहितीचे संचारानं आहे. तंत्रज्ञानाच्या शिवाय संचार सहभागांमध्ये माहितीचे आदान प्रदान शक्य नाही. तसेच हा दिवस हा ही संकेत देतो की, आमच्या जीवनात संचार किती महत्वपूर्ण आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाला देखील प्रोत्साहित करतो.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे सगळ्यात महत्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज काही सेकंदात आपल्या पर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.
बेल यांचा जन्म स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील-अलेक्झांडर मेलव्हील बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण-बधिर होत्या. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांना बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तसेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या प्रयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्युबर्ड नावाच्या कर्ण-बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल करून बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरु केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
गेल्या वर्षभरापासून माणूस हा कोरोनाने जाम जखडलेला आहे आणि तो आपल्या घरातच बंदिस्त झाला आहे. सुरुवातीला सर्वजण घरात असल्यामुळे हे किती फायद्याचे व सुखदायक आहे ह्याचे आपण सर्वजण गोडवे गाऊ लागलो. कुटुंबातील सदस्यांचे विशेष करून नवरा बायकोचे दुरावलेले संबंध मधुर व्हायला लागले ह्या बद्दल आपण बोलू लागलो. म्हणे आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ लागलो. एकमेकांना समजू लागलो.
माणूस हा तसा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात अर्थात कळपात, समूहात राहणे पसंद करतो. त्याला मनोरंजनाची खास आवड आहे. तो त्याच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत असतो.
अगोदरच्या काळी उन्हाळा असला की तो आपल्या घरातच बंदिस्त व्हायचा. कारण की घरच्या बाहेर जाम ऊन असायचे. जर घरा बाहेर पडला आणि ऊन लागले की, तो आजारी पडायचा. मग तो घरातच मनोरंजनाची साधने शोधायचा. त्यात त्याची आवड ही पुस्तके वाचणे, कॅरम खेळणे, पत्ते खेळणे, गोष्टी सांगणे, अंताक्षरी खेळणे हे असायचे. अधिकतम हे समूहानेच कुटुंबाच्या सदस्यांचे आपले मनोरंजन करून ह्यात एकमेकांविषयी जवळीक निर्माण होऊन एकत्र कुटुंब पद्धती ही वृद्धिंगत व्हायची.
दूरसंचाराने जेव्हा १९८४ पासून भारतीयांच्या जीवनात विशेष करून टी.व्ही. च्या रूपाने संचार केला व नंतर १९९१ पासून टेलिफोनच्या रूपाने संचार केला तेव्हा पासून त्यांच्या जीवनात हा आमूलाग्र बदल घडून आला. कालपर्यंत निवडक घरी टी.व्ही.होता तो सर्वांकडे आला आणि कालपर्यंत तो टेलिफोन फक्त ऑफिस मध्येच असायचा तो घराघरात दिसू लागला.
मोबाईल, इंटरनेट आणि संगणक आल्यामुळे माणसाच्या जीवनात एकदमच आमूलाग्र बदल झाला. मनोरंजनाच्या क्षेत्रात तो स्वयं केंद्रित झाला. आता त्याच्या हातात नेट आले, मोबाईल आला आणि त्याला आता कुटूंबातील सदस्यांच्या गरजेविना त्याची मनोरंजनाची गरज भासू लागली. तो हळूहळू आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या, सभासदांपासून दूर जाऊ लागला व एकलकोंड्या होऊ लागला.
आता एक वर्ष कोरोना काळात घरी घालविल्यामुळे त्याच्या मानसिक स्वास्थावर परिणाम झाल्याच्या बातम्या कानी येऊ लागल्या.
कोरोनामुळे जग थांबले त्याला पर्याय काय तर माणसाने दूरसंचाराचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन घरूनच आपले काम पूर्ण केले व कोरोना पासून आपले संरक्षण केले. एक विचार जर हा पर्याय नसता तर कोरोनाने किती तरी माणसाचे बळी घेतले असते. ह्या महामारीच्या कठीण कार्यकाळात दूरसंचार हे खरोखर माणसांसाठी
वरदान ठरले.
दूरसंचार ही खरोखरच माणसाच्या जीवनात क्रांती आणत आहे ही बाब चांगली आहे. दूरसंचाराची प्रगती दिवसेन दिवस २ जी, ४ जी आणि आता 5 जी कडे वाटचाल करीत आहे. माणसाला एकदा नेटची चटक लागली आणि त्यात तो आता वाहवत गेला आहे. तो आता तासन तास त्या नेट मध्ये अडकून पडतो आहे. कालपर्यंत हाच माणूस मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळे (नेट) टाकत होता आता तोच इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. नेट काही काळ बंद पडले की तो अस्वस्थ होतो आहे. मग तो घरी असो की, रेल्वेत,बँकेत की एल.आय.सी. त.
कोरोना काळात संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही नेट वरूनच सुरु आहे. घरूनच शिक्षण, घरूनच स्वाध्याय सुरु आहे. कालपर्यंत हे आपल्याला अशक्य वाटत होते परंतु दूरसंचाराने ते शक्य करून दाखविले आहे. आज दूरसंचारामुळेच कोरोनाकाळात आपण वैद्यकीय सुविधा रुग्णांपर्यंत पोहचू शकलो आहोत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण आपण वाचवू शकलो ही फार मोठी बाब आहे. कालच चक्रीवादळ केरळात दाखल झाले आणि त्याची माहिती आपणा पर्यंत दूरसंचाराने पोहचविली त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपण जीवित हानीचे नुकसान थांबवू शकलो.
दूरसंचाराने माणसाच्या जीवनात संचार केला ही बाब चांगली आहे. ह्याचे फायदे सुद्धा माणसाने मोठ्या प्रमाणात आपल्या फायद्यासाठी करून घेतले. माणूस विश्वात कुठेही असला तरी तो एक दुसऱ्याशी संपर्क करू शकत आहे.
असे म्हणतात की, माणसाच्या शोधाची जननी ही त्याची गरज आहे. माणसाला आपल्या गरजा, त्रास व सुखसोयी ची पूर्तता करण्यासाठी तो नवीन नवीन शोध लावत असतो व त्यात तो बऱ्यापैकी यशश्वी सुद्धा होतो.
अलेक्झांडर बेलच्या टेलिफोनचा शोध त्याच्या कुटूंबातील सदस्यांच्या मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्याची आई आणि पत्नी दोघीही कर्ण-बधिर होत्या. म्हणजेच काय तर बेल यांच्यातील माणूस जागा झाला आणि त्याला मूक-बधिरांबद्दल कणव निर्माण झाली. म्हणून टेलिफोनचा शोध लागला. म्हणजेच बेलच्या अंतरंगात चांगल्या माणुसकीच्या ध्वनी लहरींचा संचार झाला.
आजच्या दूरसंचार दिनी आपण अपेक्षा करूया की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात माणुसकीच्या चांगल्या ध्वनी लहरींचा संचार होऊन मानवजातीचे कल्याण होऊन आपण लवकरच कोरोना मुक्त होऊ या !
अरविंद सं. मोरे,
अतिथी संपादक
गौरव प्रकाशन,
मो.९४२३१२५२५१,
ई-मेल : arvind.more@hotmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *