• Sun. May 28th, 2023

करजगांव तसं चांगलं पण…!

बरडाच्या पायथ्याशी
वसलेले माझे गाव ।
लोक कर्जात बुडाले
 करजगाव त्याचे नाव ।।
येता भराटबनात
 लागे गावाची चाहूल ।
हर्ष मनात घेऊन
 पडे पुढचे पाऊल ।।
चारी बाजूनी गावच्या
आहे कोरडे लवण ।
नावलेच आमराई
 आमवृक्ष नसे दोन ।।
नाही ओलीताची सोय
असे खरबाडी रान ।
मेहनतीले पुरेना
गाती नापिकीचं गाणं ।।
मोठी खारोनी विहिर
 आहे गावाचा तो प्राण ।
पाणी असूनी नसूनी
बारोमास वणवण ।।
माडी उभी मधोमध
 मोठमोठाले आवार ।
जिवाहुन प्यारं लागे
 माझ्या गावाचं शिवार ।।
सुपीनाथ ,सेवाभाया
गावामध्ये बहिरम ।
आसरामाय मेस्कामाय
तीन तीन हनुमान ।।
यात्रा ,पोथ्या ,प्रवचन
 चाले किर्तन -भजन ।
कला, क्रिडा-खेळानी
 होई लोकांच रंजन ।।
चिंच पिंपळाचे झाडं
 होते गावाचं भुषण ।
ते ही टाकले तोडून
 गाव वाटते वसान ।।
नावाजली होती शाळा
 आता शिक्षणाची बोंब ।
नेते सारे मतलबी
विकासाची बोंबाबोंब ।।
माणसे इमानी होती
माणसांना जोडणारे ।
आता बेईमान लुच्चे
दिला शब्द मोडणारे ।।
होती खेळाडूंची वस्ती
 कलाकारांची खदानं ।
शाळेनेही घडविले
इथे शेकडो विद्वान ।।
काही रिकामचोटांच्या
काम जिवावर येते ।
जाता दिसे कोणी पुढे
 पाय धरूनी ओढते ।।
भट्ट्या दारूच्या काढती
पारावर चाले डाव ।
गुण्यागोविंदानं पत्ते
 खेळी रंक आणि राव ।।
– प्रा. रमेश वरघट
करजगाव ता. दारव्हा
 जि. यवतमाळ

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *