Header Ads Widget

मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका.....

पाठदुखीची समस्या सर्वसामान्य बाब बनली असून आता ती लहानग्यांनाही सतावू लागली आहे. निरोगी जीवनशैली, बसण्याची योग्य स्थिती आणि सर्वसाधारण व्यायाम करून पाठदुखी जडण्याची शक्यता बर्‍याच अंशी कमी करता येते. लहान मुलांमधल्या पाठ तसंच मानदुखीची अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. शाळेत बराच काळ बसून राहणं, गॅझेट्सचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने बसणं, शारीरिक हालचालीचा अभाव अशा कारणांमुळे पाठदुखी उद्भवू शकते. जड दप्तरामुळेही मुलांमध्ये पाठदुखी उद्भवत असल्याची बाब समोर आली होती. लहानग्यांमधली प्रत्येक प्रकारची पाठदुखी गंभीर स्वरूपाची नसते. अगदी साधे उपाय करून हा त्रास दूर करता येतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे बैठी जीवनशैली आणि बसण्याची अयोग्य पद्धत ही पाठदुखीची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे मुलांना साधे व्यायामप्रकार शिकवल्यास हा त्रास होण्याची शक्यता बरीच कमी होईल. अभ्यास करत असताना किंवा बसलेलं असताना शरीराची योग्य स्थिती राखणंही खूप आवश्यक आहे. पलंगावर बसून अभ्यासकरण्यापेक्षा टेबल आणि खुर्चीचा वापर करणं अधिक योग्य ठरतं. सतत पलंगावर पडून अभ्यास केल्यामुळे पाठदुखीचा त्रास वाढू शकतो. अभ्यासासाठी लॅपटॉपऐवजी डेस्कटॉपचा वापर केल्यास तसंच डेस्कटॉप योग्य उंचीवर ठेवल्यास मुलांमधली पाठदुखीची समस्या टाळता येऊ शकते. सध्याच्या काळात मुलं स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करत आहेत. पलंगावर झोपून फोन वापरणं, बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहणं, अभ्यासासाठी खुर्चीवर बसल्यानंतर पुढच्या बाजूला वाकून अभ्यास करणं, लॅपटॉपचा वापर अशा कारणांमुळे मुलांच्या पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना बराच काळ एकाजागी बसू देऊ नका. त्यांचा स्क्रिन टाईम कमी करा. मुलांना शारीरिक हालचाल करू द्या. जम्नॅस्टिक्स, हॉकी, फूटबॉल, डायव्हिंग. रेसलिंगसारखे खेळ खेळणार्‍या मुलांच्या पाठीच्या खालच्या भागावर ताण येऊन त्रास वाढू शकतो. मुलं दोन खांद्यांच्यामध्ये वेदना होत असल्याची तक्रार करत असतील तर त्यांना खेळताना दुखापत झालेली असू शकते. याशिवाय पाठीच्या कण्याचा दाह किंवा बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आलेला ताण या बाबीही अशा दुखण्याला कारणीभूत ठरू शकतात. दहा वर्षांखालील मुलांना पाठीच्या कण्यातल्या जंतूसंसर्गामुळेही त्रास होऊ शकतो. अगदी दुर्मिळ प्रसंगात पाठीच्या कण्यातल्या ट्यिूमरमुळे हा त्रास होऊ शकतो. विविध प्रकारचे खेळ खेळणारी मुलं सातत्याने एकाच स्नायूचा वापर करतात. या स्नायूंवर ताण आल्यास वेदना जाणवू शकतात. स्लीप डिस्क हा प्रकार मुलांमध्ये अभावानेच आढळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या