नवी दिल्ली : देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे दोन आठवड्यात लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसुत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे.
निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.
देशात पुन्हा एकदा करोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात संक्रमणाचा वेग वाढल्याने केंद्राने काही निर्णयही घेतले असून, त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झालं आहे. आतापयर्ंत करोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६0 वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होते. आता मध्यमवयीन व्यक्ती करोना बाधित होण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देणे गरजेचे असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असेही केंद्राने राज्यांना म्हटले आहे.