मुंबई : अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर या जोडीने बॉलीवूडला अनेक गाजलेले चित्रपट दिले. कित्येक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. चित्रपटात काम करताना त्यांच्या मनात एकमेकांबद्दल तसूभरही मत्सर नसायचा. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. ते अगदी जिवलग मित्र होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र २0२0 मध्ये ऋषी यांचे कर्करोगाने निधन झाले आणि चित्रपटसृष्टीने एक अनमोल कलाकार गमावला. आज अजूबा चित्रपटाला ३0 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींना पुन्हा एकदा ऋषी यांची आठवण आली. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांचे दु:ख बोलून दाखवले.
अजूबा चित्रपटाला ३0 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे अमिताभ ऋषी आणि शशी कपूर यांच्या आठवणीने हळवे झाले. ऋषी यांनी अमिताभ यांच्यासोबत अजूबा चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होती तर शशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शशी कपूर यांचे भाऊ शम्मी कपूरदेखील चित्रपटाचा एक भाग होते. दोन वर्ष कर्करोगाशी लढा दिल्यानंतर ऋषीजींचे निधन झाले. अमिताभ यांनी त्यांची आठवण काढत ट्विटरवर एक भावुक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, अजूबाची ३0 वर्ष. वर्ष सरत राहिली.. सुखाची आणि दु:खाची.. सोबती तर निघून गेले, आठवणींमध्ये भरून राहिले!
त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी त्यांचं सांत्वन केले आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना धीर दिला आहे. अजूबा चित्रपट १२ एप्रिल १९९१ साली प्रदर्शित झाला होता. यात अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अमरीश पुरी आणि डिंपल कपाडिया या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं दिग्दर्शन शशी कपूर आणि गेनाडी वासिलीव यांनी केलं होतं. हा चित्रपट तेव्हा चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
वर्ष सरत राहिली. सोबती मात्र निघून गेले
Contents hide