महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील

नवी दिल्ली:आधी परमबीर सिंग आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रानंतर महाराष्ट्र सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. या पत्रांमधून आरोप करण्यात आल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी रामदास आठवले यांनी परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांचा संदर्भ देत राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १00 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये केला आहे. त्याचा तपास सध्या सीबीआय करत असून या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची देखील चौकशी केली जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!