• Sat. Jun 3rd, 2023

भारतातून टी-२0 विश्‍वचषक इतरत्र हलवणार?

नवी दिल्ली : भारतात यंदाच्या वर्षाच्या शेवटाला आंतरराष्ट्रीय टी-२0 विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. पण देशात सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने (आयसीसी) करण्यात आलेले विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) चिंता वाढवणारे ठरणार आहे.
आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जोफ अलार्डिस यांनी यंदाच्या वर्षात भारतात होणार्‍या टी-२0 विश्‍वचषक स्पर्धेसाठी ‘बॅकअप प्लान’ तयार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे आयसीसीकडून टी-२0 विश्‍वचषक इतरत्र हलविण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, देशात कोरोना वाढत असला तरी टी-२0 विश्‍वचषक भारतातून हलवून दुसर्‍या ठिकाणी नेण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

टी-२0 विश्‍वचषकाचे आयोजन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये केले जाणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण असे असतानाही देशात आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात देखील होत आहे. त्याच धर्तीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही विश्‍वचषक स्पर्धेचेही आयोजन केले जाईल असा विश्‍वास बीसीसीआयला आहे.
टी-२0 विश्‍वचषक स्पर्धेच्या निर्धारित योजनेनुसारच आम्ही सध्या पुढे जात आहोत. पण आमच्याकडे बॅकअप प्लान देखील तयार आहे. पण त्या गोष्टींवर सध्या आम्ही विचार करत नाहीय. बीसीसीआयसोबत आमची चर्चा सुरू आहे. गरज पडल्यास बॅकअप योजनेवर काम केले जाईल, असे जोफ अलार्डिस यांनी सांगितले. ५३ वर्षीय अलार्डिस हे ऑस्ट्रेलियासाठी स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. कोविड काळात क्रिकेट कसं खेळवलं जातंय हे समजून घेण्यासाठी आयसीसी इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाशी देखील संपर्कात असल्याचे ते म्हणाले. सध्या अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळवले जात आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *