मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. बुधवारी सकाळपासूनच मुंबईच्या राजकीय वतरुळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. तर सरकारकडून मात्र मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीतच सोहळा आयोजित केल्याचे सांगितले जात होते. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर संध्याकाळी ५.३0 वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे एकूणच या सोहळ्याला महाविकासआघाडीचा सोहळा असेच स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले.
भूमिपूजनाचा विधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन
Contents hide