• Sat. Sep 23rd, 2023

” नीरज – वात्सल्याची मातृसंहिता..! “

मुलाने किंवा मुलीने आई- वडिलांबद्दल लिहिलेली अनेक पुस्तकं मराठी भाषेत वाचायला मिळतात. त्यामध्ये मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र म्हटल्या गेलेल्या ‘श्यामची आई’ पासून ते मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अडाणी बापाची कथा सांगणाऱ्या ‘आमचा बाप अन् आम्ही’ पर्यंत अनेकविध वाङ्मयप्रकारांमधली कित्येक पुस्तकांचा समावेश केला जाऊ शकतो. पण एखाद्या आईने किंवा बापाने आपल्या मुलाबद्दल लिहिलेली पुस्तकं किती असतील? खूप कमी! असतील.. किंवा नसतीलही! पण नुकतंच माझ्या वाचनात असं एक पुस्तक आलंय. एका आईने काळजाचा कागद अन् अश्रूंची शाई करून आपल्या मुलाच्या जागवलेल्या आठवणींचं पुस्तक. नीरज.
नीरज. एक अतिशय हुशार मुलगा. जगभरातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणारा. केवळ ज्ञान मिळवून थांबणारा नाही तर त्या ज्ञानाचं विश्लेषणही करणारा. जितका हुशार तितकाच संवेदनशीलही. इतरांच्या वेदना समजून घेणारा. शब्द सूर संगीताची आवड आणि जाण असणारा. रंगरेषांवर प्रभुत्व असणारा. विविध कला गुण संपन्न असा हा नीरज. पण दुर्दैवाने नीरजचं हृदय जन्मतःच कमजोर. त्याच्या दुर्धर आजाराने त्याच्या हृदयावर जरी वार केलेला असला तरी त्याचं व्यक्तीमत्व मात्र तो वार पचवून कमळासारखं खुललेलं. सर्वांना प्रभावित करणारं. प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करणारं.!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अशा आपल्या लेकराबद्दल एक आई आपल्याला काही सांगू पाहतेय. यातून तिला नीरजबद्दल सहानुभूती मिळवायची नाहीये. आणि आपल्या दुःखाचं गाऱ्हाणंही मांडायचं नाहीये. कारण त्या सगळ्या वेदना तिने भोगून झाल्यात. तिला सांगायचंय नीरजबद्दल. सगळ्या वेदना, प्राक्तनाने मांडलेला सगळा छळ पचवूनही आनंदाने आणि भरभरून जगणाऱ्या नीरजबद्दल! कारण नीरजचं जगणं रडत कुंथत जगणाऱ्या कित्येक धडधाकट माणसांना जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगतं. तो सतत भ्रमंती करत राहण्याचा संदेश देतो. असह्य वेदना सहन करूनही तिरूपतीच्या रांगेत उभा राहतो. तो डोळ्यांमध्ये निसर्गाची अनेक रूपं साठवून ठेवण्यासाठी धडपडतो. तो अरिजितच्या गाण्याच्या प्रेमात पडतो. तो राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होतो. तो जगजितसिंहाच्या जाण्याने हळवा होतो. तू सुंदरशी स्केचेस रेखाटतो. वाट्याला आलेल्या आयुष्याचा क्षण नि क्षण तो भरभरून जगतो. काहीतरी सटरफटर कारणावरून मरण जवळ करणाऱ्या माणसांनी नीरजच्या जगण्यातून ‘जगणं’ म्हणजे काय असतं ते शिकलं पाहिजे.
हे पुस्तक वाचताना कित्येकदा डोळे पाणावले. तुम्ही कितीही कठोर काळजाचे असाल तरीही ‘नीरज’ वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतातच. मग प्रत्यक्ष ज्या आईनं हे सगळं अनुभवलंय तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. वीस वर्षांपर्यंत जो बाळ सतत डोळ्यासमोर राहिलेला आहे त्याच्यापासून दूर होण्याची व्यथा शब्दात मांडलीच जाऊ शकत नाही. ती केवळ जाणीवेनेच समजली जाऊ शकते! या पुस्तकातला प्रत्येक प्रसंग वाचताना आपण स्वतः तिथे कुठेतरी उभे आहोत याची जाणीव होत राहते. आणि आपणच काय… कुणीच त्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही ही जाणीवही सलत राहते. पुस्तक जरी नीरजबद्दल असलं तरी कुठेतरी वाचणारा माणूस विवेक सरांशी आणि नेहाशीही कनेक्ट होतो. जयश्रीताई तरी त्यांच्या वेदनांना लेखणीच्या माध्यमातून वाट करून देतात. पण विवेक सरांच्या वेदनांचा निचरा कसा होत असेल असा वेदनादायक आणि दाहक प्रश्न पडतो. ज्याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडेही नसेल.
प्रख्यात साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी या पुस्तकाबद्दल लिहिताना ही ‘वत्सलरसाने व्याप्त मातृसंहिता’ आहे असं म्हणतात. ते तसं का म्हणतात याचे पुरावे या पुस्तकाच्या पानापानावर वाचायला मिळतात. तसं पाहता मराठीतल्या कोणत्याही साहित्य प्रकाराच्या चौकटीत मावणारं हे पुस्तक नाहीये. कुठेही वाङ्मयीन अभिनिवेश नाही. जे काळजातून आलं तेच कागदावर उमटलंय. जयश्री सोन्नेकर या उत्तम लिखाण करणाऱ्या साहित्यिका असल्या तरी या पुस्तकातून ‘लेखिका’ म्हणून त्या स्वतःला मांडतच नाहीत! त्यांना लेखिका म्हणून वाचकांपर्यंत पोचण्याची धडपडही त्या करत नाहीत! त्यांना ‘नीरज’ वाचकांपर्यंत पोचवायचाय आणि हे पुस्तक वाचल्यानंतर ‘नीरज’ अगदी काळजात खोलपर्यंत जाऊन पोचतो! प्रत्येक वाचकाच्या काळजात तो नव्याने जन्म घेतो. आणि नकळत जाणीव होते..

  ” नीरज मरा नहीं…. नीरज मरते नहीं! “
  पुस्तकाचे नाव : नीरज
  लेखिका : सौ. जयश्री विवेक सोन्नेकर
  प्रकाशक : मयूर प्रकाशन, नांदेड
  पृष्ठे : ८०
  मूल्य : १०० रू.
  पुस्तक परिचय :
  शिरीष पद्माकर देशमुख
  मंगरूळ ता मंठा जि जालना
  मो. 7588703716

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,