• Sat. Jun 3rd, 2023

देशमुखांचा राजीनामा; वळसे पाटील नवे गृहमंत्री

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. गृहमंत्रालयाचा कारभार राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे कामगार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी महिन्याला १00 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तसेच अँड. जयश्री पाटील यांनी रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १00 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे अँड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज ५ एप्रिल २0२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *