मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोन सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने याच सोशल मीडियाच्या साहाय्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एका मोठय़ा संस्थेच्या अध्यक्षपदाचा तिने राजीनामा दिला आहे.
दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज म्हणजे मामी या संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदार्यांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना ती म्हणते, या संघटनेच्या संचालक मंडळात असणं आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं हा खरंच खूप काही शिकवणारा अनुभव होता. कलाकार म्हणून जगभरातून चित्रपट आणि प्रतिभावान कलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणं हे खूप जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम होतं. पण मला असं लक्षात आलं आहे की, माज्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी मामीच्या कामाकडे आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकेन. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले ऋणानुबंध शेवटपयर्ंत कायम राहतील.
आपल्या या पोस्टची सुरुवात करताना दीपिका म्हणते, आपल्याला कधी एकटं वाटू न देण्याची ताकद चित्रपटात आहे. या डिजीटल स्ट्रिमिंग आणि सोशल मीडियाच्या युगात आपण हळूहळू स्वत:ला एकटं करुन घेत आहोत. पणमामी ही संस्था सीमांची सर्व बंधनं झुगारून आपल्याला एकत्र बांधून ठेवत आहे. एक कलाकार म्हणून मला चित्रपटाच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी तर म्हणेन आपल्याला आत्ता त्याची गरज आधीपेक्षाही जास्त आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच रणवीर सिंगसोबत ८३ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट माजी क्रिकेटवीर कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. त्याचबरोबर ती अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबतही आगामी चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती द इंटर्न या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.
दीपिका पादुकोनने दिला मामीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Contents hide