चकमकीतील शहीद जवानांची संख्या २२

विजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात पाच जवान शहीद आणि १२ जवान जखमी झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चकमकीत जवानांनी २५ नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि बिजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही अचानक चकमक उडाली. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते. यावेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांकडून गोळीबार करण्यात आला. ही धुमश्‍चक्रीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद झाले, तर अन्य १२ जण जखमी झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती.

या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. त्यामुळे नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत एकूण २२ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान अजून बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. या धुमश्‍चक्रीत तब्बल ३१ जवान जखमी झाले आहेत. जवानांना तातडीने विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, सात जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली. कुलदीप सिंह यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त असून, यात एका महिलेचाही समावेश आहे.