अहमदाबाद : गुजरातच्या कृषी विभागात अकाउंट ऑफिसर असलेल्या ३५ वर्षीय श्वेता मेहता साहू यांना दोन आठवड्यांपूर्वी घशात त्रास व्हायला लागला. श्वेता आणि त्यांचे पती तपस यांनी जे हवाई दलात पायलट आहेत, त्यांनी थंड पाणी पिण्याचे बंद केले. उन्हाळा असल्यामुळे त्यांनी माठ आणला. यानंतर श्वेता यांना घशात होणारा त्रास बंद झाला. त्यांचे दैनंदिन जीवन सुरू झाले. त्यांच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार होता. श्वेता आणि तपस यांचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्या गर्भवती होत्या. त्यांना पहिले बाळ होणार होते.
गेल्या आठवड्यात सोमवारी श्वेता यांना जुलाब झाले. यानंतर त्यांनी लष्कराच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. यानंतर डॉक्टरांनी नियमानुसार श्वेता यांची कोरोनाचा चाचणी केली. त्यात त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आणि तेव्हापासून या श्वेता आणि तपस यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. श्वेता यांना २३ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, अशी माहिती कोरोनामुळे श्वेता यांना गमावून बसलेल्या त्यांचे पती तपस यांनी दिली. श्वेता यांचा या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाला.
श्वेताची प्रकृती बिघडत गेली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या दुसर्याच दिवशी तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. ती व्हेंटिलेटवर गेली तर तिथून परतलीच नाही. तिला आम्ही एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे डॉक्टरांच्या तपासणीत त्यांची काही अवयव काम करत नसल्याने अडचणी वाढल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या हृदयाची क्रिया बंद पडली, असे तपस यांनी सांगितले. श्वेता यांची प्रकृती खूपच खालावली होती. अशात बाळाला वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा बिकट परिस्थितीतही या निर्णयाने तिच्यावर आणखी दबाव आला. पण श्वेताने बाळाला जन्म दिला. आम्हाला मुलगी झाली. पण ती दोन तासांहून अधिक जगू शकली नाही. पत्नीला तिला साधे हातातही घेता आले नाही, असे भावूक झालेल्या तपस यांनी सांगितले.
आपल्या चिमुकल्या मुलीला अखेरचा निरुप देऊन आल्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे २९ मार्चला श्वेता यांचाही मृत्यू झाला. कोरोनाने श्वेता यांचा बळी घेतला. श्वेता अतिशय वेगळी होती.. तरुण असताना ती गेली. तिला खूप जगायचे होते. समाजासाठी आणि जगासाठी तिला काम करायचे होते. ती एक उत्तम स्त्री होती. स्वार्थाचा लवलेशही नव्हता. श्वेता आपली पत्नी असल्याने मी भाग्यवन ठरलो होतो. पण ती खूप लवकर सोडून गेली, असे भावूक झालेले तपस म्हणाले.