नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट अतिशय भयानकपणे वाढत आहे. आगामी काळात दररोजच्या रुग्णसंख्या वाढीचा आकडा एक लाखांवर जाण्याची शक्यता आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढलेला आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्णांमध्ये ८१,४६६ हजारने भर पडली आहे. रुग्णसंख्येबरोबर मृतांचा आकडादेखील वेगाने वाढत चालला आहे. चोवीस तासांत ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि इतर संबंधित संस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. जास्तीत जास्त टेस्टिंग, स्क्रीनिंग, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, विलगीकरणीवर भर देण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. रोजच्या रुग्णसंख्या वाढीचा ८१ हजारचा आकडा गतवर्षी १ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आला होता. त्यानंतर मार्चमध्ये इतकी मोठी संख्या नोंदवण्यात आली आहे. ज्या हिशेबाने रुग्ण वाढत आहेत, ते पाहता येत्या काही दिवसांत रोजच्या रुग्णवाढीचा आकडा एक लाखांच्याही पुढे जाण्याची भीती आहे. कोरोना विषाणूची मारक क्षमता जास्त असण्याबरोबरच लोकांकडून वाढत असलेली बेफिकिरी रुग्णवाढीचे मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या कोरोना वेगाने फैलावत असल्याने लोकांनी विशेष जागरूक राहणे आवश्यक असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात चिंता वाढली
सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. वरील पाच राज्यांतून एकूण रुग्णांपैकी ८0 टक्के रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त ६२ टक्के इतकी रुग्णांची संख्या आहे. देशाची राजधानी दिल्लीतील कोरोनाचे संकटही वाढत चालले आहे.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका !
Contents hide