कुटे गुरुजी…एक निरपेक्षवृत्तीचा -उपक्रमशील शिक्षक

नारायणराव गोविंदराव कुटे गुरुजी यांचा जन्म २६ जुलै १९४१ साली वरुडखेड येथे झाला. कुटे गुरूजी म्हटले की, चांगले साडे पाच फुटांपेक्षा उंच तसेच अंगापिंडाने भरलेले गौरवर्णी, थोडा लांब चेहरा, पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर प्रेसचे शर्ट असे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचॆ होते. ते स्वभावाने जरी कडक असले तरी तितकेच मनमिळावू होते. तसेच सद्वर्तनी आणि निष्कलंक चारित्र्याचे होते.
मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डीएड केले आणि १७ जुलै १९६३ ला ते यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये माळेगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवारत असताना अचलपूर येथे इंग्रजी विषयाचा कोर्स पूर्ण केला, नंतर पांढुर्णा आणि करजगाव येथे १९६७ ला रूजू होऊन १९९७ पर्यंत करजगांवला ३० वर्ष कार्यरत होते, असा त्यांच्या सेवेचा प्रवास झाला. करजगावी असताना त्यांना सदाशिव गोविंदराव भोयर, सालपे गुरूजी, भालेराव गुरूजी, गायकवाड गुरूजी इत्यादी मुख्याध्यापकांच्या हाताखाली शिक्षणसेवा करण्याची संधी मिळाली. तसेच नथ्थुसिंग प्रभुसिंग चव्हाण, जानराव सदाशिवराव भोयर, धनंजय शेषरावआप्पा बेंद्रे, नवरे गुरूजी, अंबादास बळवंतराव पेठकर गुरूजी या शिक्षका समवेत काम करण्याची संधी मिळाली, तर मुख्याध्यापक मोतीराम श्रीमलजी आठवले गुरूजी हे त्यांचे परममित्र होते. तसे त्यांचे सर्वांशीच स्नेहाचे व मैत्रीपूर्ण संबंध राहिले.
कुटे गुरूजी मला सहावीत माझे वर्गशिक्षक होते. विद्यार्थ्यांना कर्दनकाळासारखे वाटणारे इंग्रजी आणि गणित हे विषय अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिकवत. गणितातील एखादा मुद्दा कळला नसल्यास ते अनेक उदाहरणे घ्यायचे. त्यांचे हस्ताक्षर फारच सुंदर आणि वळणदार होते. वर्ग सजावटीचे गणिताची चार्ट, इंग्रजी व्याकरणाची चार्ट, प्राण्याचे चित्रांची चार्ट ते स्वतः तयार करायचे ते चांगले चित्रकार होते. एक उपक्रमशील शिक्षक होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा प्रयत्न कुटे गुरूजींनी नेहमीच केला. आपल्या वर्तनातून विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे महान कार्य त्यांनी केले. आम्हाला स्वतःबद्दल विचार करण्यास शिकविले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कुटे गुरूजींनी पुरस्काराची, बक्षिसांची अपेक्षा न करता आपल्या निरपेक्ष वृत्तीने अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे केले. गुरूजींचे अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या हुद्यावर गेलेत. कुणी डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी बनलेच सोबत आदर्श नागरिक सुद्धा बनलेत. आपल्या सातत्यपूर्ण ३६ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी उपयोगी यशस्वी उपक्रम राबविलेत. कुटे गुरूजी वरूड येथील शाळॆतून सन १९९९ साली नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेत.
सध्या कुटे गुरूजींचं वय जवळपास 80 च्या पुढे आहे. सर्व मुलींची लग्ने झालीत. वार्धक्यामुळे थोडे थकले आहेत. प्रकृती ठीक राहत नाही. दम्याचा त्रास असल्याकारणाने ते घरीच राहतात. “आपण भले आणि आपले काम भले” या वृत्तीने सुखी, समाधानाने आपल्या परिवारासमवेत जीवन व्यतीत करीत आहेत. नवीन पिढीतील विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे, चांगला अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, कठोर परिश्रमाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश त्यांनी झालेल्या छोटेखानी सत्कारप्रसंगी दिला.

– प्रा. रमेश वरघट*