नाशिक: ऑक्सिजन बेड न मिळाल्याने पंचवटीतील एका कोरोनाग्रस्त मातेला घरातच प्राण सोडावा लागला. त्यानंतर तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने एकट्या लेकीलाच कारमधून मृतदेह स्मशानात न्यावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचे अक्षरश: वाभाडे निघाले आहेत.
पंचवटीतील अमृतधाम परिसरातील उषा डिगंबर इंगळे (वय ७0) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी त्यांच्या कन्या गायत्री यांनी चार- पाच दिवसांपासून बरेच प्रयत्न करत होत्या. अनेकांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी त्या करत होत्या. अखेर मध्यरात्री या मातेने राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यूनंतरही त्या लेकीला आपल्या मातेच्या अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागले. चार तास प्रतीक्षा करूनही शववाहिका मिळाली नाही. अखेर या लेकीनेच आपली कार काढली आणि कारमध्येच मातेचा मृतदेह टाकून थेट स्मशानभूमीचा रस्ता धरला. अंत्यसंस्कारासाठी मृत्यू दाखला लागत असल्याने जातानाच आधी मेरी कोविड सेंटर गाठले. तिथून मृत्यू दाखला घेतला आणि पुढे पंचवटी अमरधाममध्ये त्या मातेवर अंत्यसंस्कार पार पडले. या धक्कादायक प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.
बेड मिळत नसल्याने कोरोनाबधितांना कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्याची घटना ताजी असतानाच आता पंचवटीत एक महिलेला ऑक्सिजन बेड न मिळाल्याने प्राण गमवावा लागला आहे. दुसरीकडे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड बरोबरच आता शववाहिकेचाही तुटवडा असल्याची आणखी एक समस्या निर्माण झाल्याने मरणानंतरही मृतदेहाच्या यातना काही पिश्चा सोडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. चार दिवसांपासून आईला ऑक्सिजन बेड मिळावा, यासाठी त्या ताई आमच्या संपर्कात होत्या. मात्र आमचेही प्रयत्न निष्फळ ठरले. दिवसभरात शेकडो फोन येतात. मदत कुणाला आणि कशी करावी असा प्रश्न आहे. महापालिकेच्या अपुर्या यंत्रणेचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. लोकांचे अक्षरश: जीव जात असताना मनपा प्रशासनाला काहीच गांर्भीय कसे नाही, याबाबत खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते धनंजय माने यांनी व्यक्त केली
..आणि लेकीनेच नेला कोरोनाग्रस्त मातेचा मृतदेह स्मशानात
Contents hide