अनिता पगारे

परिवर्तनवादी चळवळीतील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या, स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रेसर, आदिवासी, कष्टकरी महिलांच्या तारणहार समजल्या जाणार्‍या अनिता पगारे यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीला मोठी हानी पोहोचली आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी विविध संस्थांच्या सोशल माध्यमांवर जेंडर, विशाखा गाइड लाइन यासंदर्भात प्रशिक्षण दिले. स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठा लढा दिला होता. विषयाचा सखोल अभ्यास, धारदार आवाज नि ओतप्रोत ओसंडून वाहणारा आत्मविश्‍वास या गुणांच्या जोरावर अनिता र्शोत्यांना खिळवून ठेवायच्या. राज्यातीलच नव्हे तर सबंध देशातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होता. प्रख्यात विचारवंत आणि स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ कमला भसीन यांच्यासमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्याजवळ उत्तम संघटन कौशल्य होते. शिवाय, संवादातून योग्य आणि नेमके मांडण्याची विलक्षण हातोटी होती. कोणताही प्रश्न किंवा मुद्दा त्या मुळातून समजून घ्यायच्या, मग त्यावर आपले मत अथवा अभिप्राय व्यक्त करायच्या. ज्या सामाजिक वातावरणातून जिद्दीने पुढे येऊन अनिताने ओळख प्रस्थापित केली, ती खरोखरच प्रेरणादायी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यांच्या अकाली जाण्याने अनेक वस्त्या पोरक्या झाल्या आहेत. समाजाचे बदलणारे प्रश्न, त्यांची सखोल जाण, अभ्यासू पण लोकसंग्रह, समोरच्याला समजून घेण्याची आस या गुणांवर कायमच वर्तमानाचा विचार करून त्या लढा द्यायच्या. स्त्रीमुक्ती, वंचित वर्गाचे प्रश्न, भूमिहीन वर्गाचे प्रश्न तसेच शालेय पातळीवरील मुलींचे भावविश्‍व जाणून घेऊन तळागाळापयर्ंत त्या पोहोचल्या. आक्रमकता, अभ्यासूवृत्ती, विवेक आणि समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी हे सारे गुण त्यांच्यात होते. त्यामुळेच विविध सामाजिक चळवळीत त्यांच्याबरोबर काम करणार्‍यांना त्यांच्या निधनाने अतीव दु:ख होणे साहजिक आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी तसेच आंबेडकरवादी चळवळीची हानी झाली आहे. नाशिक शहरातील फुलेनगरच्या वस्तीत जन्मलेल्या अनिता पगारे यांनी आपल्या अभ्यासूवृत्तीमुळे सामाजिक चळवळींत घेतलेली झेप अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. अंगी असलेल्या झुंजारपणामुळेच त्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महिलांचे हक्क आणि हिंसा या विषयावर आवाज उठवू शकल्या. वंचितांसह भूमिहिनांचे प्रश्न, शालेय मुलींचे भावविश्‍व हे विषय त्यांनी परिसंवाद, मेळाव्यांत मांडलेच; पण वर्तमानपत्रे-नियतकालिकांतूनही त्या वेळोवेळी व्यक्त झाल्या. समाजाशी संबंधित आणि प्रामाणिकतेचा गंध असेल तर त्या कोणत्याही आंदोलनात सहभागी होत. त्यामुळेच समता आंदोलन, छात्रभारती, दक्षिणायन, नर्मदा बचाव अशा वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये अनिता यांचा सक्रिय वावर राहिला.